करोनाची धास्ती, प्राणवायूची कमतरता यामुळे मागणीत वाढ

मुंबई : राज्यात प्राणवायूअभावी रुग्णांची परवड होत असल्याने प्राणवायूने भरलेल्या छोटय़ा बाटल्यांच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. करोना रुग्णांसाठीच नव्हे तर पुढेमागे करोना झाल्यास घरातल्या व्यक्तींना प्राणवायूअभावी त्रास होऊ नये, म्हणूनही अनेकजण ‘पोर्टेबल ऑक्सिजन कॅन’ खरेदी करत आहेत.  गेल्या काही दिवसात औषधांच्या दुकानांमध्येही प्राणवायूबाबत मागणी वाढू लागल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

‘गेल्या आठ दिवसात मोठय़ा प्रमाणावर पोर्टेबल प्राणवायूची विक्री झाली आहे. आता आमच्याकडेच साठा उरलेला नाही. तरीही नागरिक मागणी करीत आहेत. नवीन साठा आला तरी अल्पावधीतच तो संपेल,’ असे खार येथील प्राणवायू पुरवठादाराने सांगितले.

काही लोक तरतूद म्हणून पोर्टेबल प्राणवायू जवळ बाळगत असल्याचेही पुरवठादारांनी सांगितले. ‘समाजमाध्यमांवर याविषयी मोठय़ा प्रमाणात लिहिले जात असल्याने लोक तेच वाचून येतात आणि आमच्याकडे मागणी करतात. परंतु औषधाच्या दुकानात प्राणवायू मिळत  नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते,’असे औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दर दिवशी किमान १२०० लोकांचे फोन मला येत आहेत. लोक प्राणवायूसाठी अक्षरश: रडत आहेत. एखाद्या रुग्णाला रुग्णालयाकडून सेवा मिळण्यात दिरंगाई होत असेल आणि त्याला प्राणवायू घेण्यास अडथळा येत असेल, तर पोर्टेबल प्राणवायूमुळे रुग्णाला बराचसा धीर मिळू शकतो. यामध्ये ९९ टक्के  शुद्ध प्राणवायू असल्याने त्यापासून कोणताही धोका नाही. सध्या आम्ही दिवसाला चार ते पाच हजार कॅनची निर्मिती करीत आहोत आणि तितकीच विक्रीही होत आहे; किंबहुना दिवसेंदिवस मागणी अधिक वाढत आहे.

विनोद शिंदे, प्रमुख – ब्रेझो प्राणवायू 

पोर्टेबल कॅन म्हणजे?

पोर्टेबल कॅन ही करोनाकाळात निर्माण झालेली संकल्पना नाही. याआधीही अशा कॅनची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होत होती. हृदयरोगाचे रुग्ण, गिर्यारोहक, अस्थमाग्रस्त याचा वापर करतात. सध्यस्थितीत रुग्णाला वेळेत खाट मिळणे आणि त्यामध्ये प्राणवायूची सोय असणे काहीसे कठीण झाल्याने तात्पुरती सोय म्हणून हे कॅन वापरले जात आहेत. ५०० ते १००० रुपये दर असलेले हे कॅन सहज सोबत बाळगता येतात. एका कॅनमधून २५० ते ३५० वेळा प्राणवायू स्प्रे केला जाऊ शकतो.