लष्कराच्या धर्तीवर माहिती संकलन; कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी स्वातंत्र्यदिनापासून उपक्रम

जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई : भारतीय लष्कराप्रमाणे पोलीस दलात कार्यरत प्रत्येकाची सातत्याने संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून या तपशिलांचा मध्यवर्ती डेटाबेस तयार के ला जाणार आहे. सशक्त पोलीस दल निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबई पोलिसांनी हा महत्त्वाकांक्षी उपक्र म हाती घेतला असून स्वातंत्र्य दिनापासून वैद्यकीय चाचण्यांना सुरुवात होईल, असा अंदाज आहे.

या उपक्र मांतर्गत सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या, हृदयाशी निगडित टू डी एको, टीएमटी चाचणी, श्वसन संस्था व फु प्फुसाशी संबंधित पीएफटी चाचणी, कर्करोग, दात आणि डोळ्यांसह स्त्रीरोगाशी निगडित सर्व चाचण्या के ल्या जाणार आहेत. मुंबई पोलीस दलात ४५ हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे. इतक्या मनुष्यबळाची चाचणी करून घेण्यासाठी आवश्यक असलेली अद्ययावत उपकरणे, यंत्रे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ-तंत्रज्ञ आणि डेटाबेस तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी मंडळींची व्यवस्था उभी करण्याचे काम सध्या नागपाडा येथील पोलीस रुग्णालयात वेगाने सुरू आहे.

या व्यवस्थेद्वारे वर्षभरात १८ ते २० हजार पोलिसांची संपूर्ण चाचणी पूर्ण होऊ शके ल. त्यामुळे पुढील अडीच वर्षांमध्ये संपूर्ण पोलीस दलाची चाचणी पूर्ण करून त्यांचे अहवाल डेटाबेसमध्ये उपलब्ध होऊ शकतील. ४५ किं वा त्याहून जास्त वय असलेल्या अधिकारी, अंमलदारांची वर्षांतून एकदा, तर ४० किं वा त्याखालील अधिकारी, अंमलदारांची तीन वर्षांनी एकदा संपूर्ण चाचणी के ली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात या उपक्र मामुळे पोलीस दलातील प्रत्येक अधिकाऱ्याच्या व्यावसायिक तपशिलांसह वैद्यकीय तपशीलही एका क्लिकवर उपलब्ध होईल.

वर्षभरापासून या उपक्र माची आखणी सुरू होती. करोनामुळे काही काळासाठी काम थांबल्याने उपक्रम लांबणीवर पडला. मात्र सध्या हे काम वेगाने सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक ती यंत्रे, उपकरणांच्या खरेदीसह नागपाडा पोलीस रुग्णालयाचा कायापालट वेगाने सुरू आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी दिली. शासन, पोलीस कल्याण मंडळ आणि देणगीदारांनी के लेल्या आर्थिक मदतीतून हे काम सुरू असून वर्षभरात सुमारे २० हजार पोलिसांचे संपूर्ण, मिनी चेकअप करून घेण्यासाठी पाच ते सहा कोटींचा अंदाजित खर्च आहे, असे बजाज यांनी स्पष्ट केले.

गरज का?

वरिष्ठ अधिकारी म्हणजे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त किं वा वरिष्ठ निरीक्षकांनी शासकीय यंत्रणा किं वा स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आपापल्या अधिकारक्षेत्रात पोलिसांच्या चाचण्या करून घेतल्या होत्या. मात्र त्या चाचण्या अलीकडच्या काळातील नाहीत, प्रत्येकाचे वैद्यकीय तपशील एकत्रित उपलब्ध नसल्याने करोना काळात पोलीस दलाला फटका बसला. सर्वसामान्यांसोबत सर्वाधिक संपर्क असलेल्या पोलीस दलातील कोणाला पहिल्या फळीत ठेवावे, कोणाला राखीव ठेवावे याबाबतचे धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी उभ्या राहिल्या. विशेष म्हणजे अनेकांनी लक्षणे दिसूनही अंगावर काढल्याने व्याधी बळावल्या.

काय होईल?

वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार करून व्याधी दूर करता येतील. करोनासारख्या परिस्थितीत चौकटीबाहेरील जबाबदारी, आव्हाने स्वीकारण्याची वेळ येईल तेव्हा या वैद्यकीय डेडाबेस आधारे झटपट व्यूहरचना आखता येईल, महत्त्वाचे निर्णय घेता येतील.