अनेक कारणांनी सध्या आर्थिक तडजोडी करणाऱ्या विद्यापीठांना आता उच्चशिक्षणमंत्र्यांच्या प्रसिद्धी सोहळ्यांच्या खर्चाचा भारही पेलावा लागणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा कोटय़वधी रुपयांचा खर्च उच्चशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठ आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) माथी मारला आहे.

सामंत यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘उच्चशिक्षण मंत्रालय @’या उपक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, विद्यापीठ किंवा कोणत्याही महाविद्यालयाच्या परिसरात हा उपक्रम न घेता वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित केला आहे. त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च येणार असून तो सगळा मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठाने करावा, अशी सूचना मंत्रालयाने दिली आहे.

पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या कार्यक्रमाला मंत्री, स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना बोलावण्यात यावे. त्यांच्या सूचना मागवून घ्याव्यात. कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यात यावी. बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी निवासाची, वाहनाची व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुंबई विभागाचे उच्चशिक्षण सहसंचालक आणि विद्यापीठांच्या कुलसचिवांना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमासाठी स्वतंत्रपणे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. विद्यार्थी संघटना, विद्यापीठातील अधिकार मंडळाचे सदस्य, अधिकारी यांनी या कार्यक्रमाबाबत आक्षेप घेतले आहेत.

गर्दीची काळजी..

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची सूचना देण्यात आली असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई क्षेत्रातील महापालिकांनी मात्र महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही.

करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीच्या धास्तीने महाविद्यालये, शाळा सुरू करण्याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही. इतकेच नाही तर लोकल रेल्वेही पूर्णवेळ सुरू करण्यात आलेली नाही, असे असताना मंत्र्यांच्या मेळाव्यासाठी मात्र शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पालक यावेत यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

विद्यापीठाची यंत्रणा असतानाही..

* विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग अशा विविध टप्प्यांवर तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत आहेत. त्या असतानाही हा स्वतंत्र घाट घालण्याचे कारण काय? त्याचप्रमाणे उच्चशिक्षणमंत्री विद्यापीठाच्या परिसरातही विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतात, त्यासाठी मोठय़ा मैदानात स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यासाठी खर्च का करावा, असे प्रश्न विद्यापीठातील अधिकारी, अधिकार मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित केले आहेत.

* या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी फलकांच्या छपाईपासून ते मंडप घालण्यापर्यंत कंत्राटदारही निश्चित करण्यात आले आहेत. त्याची देयके देण्यासाठी विद्यापीठाकडील निधी मंत्रालयाला दिसत आहे. प्रसिद्धीसाठीच लाखो रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

उच्चशिक्षणमंत्र्यांच्या कार्यक्र माचे स्वरूप पाहता खर्चाचा भार मुंबई आणि एसएनडीटी विद्यापीठावर टाकण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी हा कार्यक्रम असेल तर तो विद्यापीठ कायद्यानुसार जबाबदार अधिकारी किंवा यंत्रणांनी  घ्यावा. विद्यापीठ स्वायत्त आहे. त्यात शासनाने हस्तक्षेप करू नये. विद्यापीठानेही त्यांच्या पैशात शासनाचे कार्यक्रम करू नयेत.

– वैभव नरवडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, मुंबई विद्यापीठ