नवरात्रोत्सवात मध्यरात्रीपर्यंत खेळला जाणारा गरबा ऊर्जेचा, उत्साहाचा आणि नवचतन्याचा प्रतीक असला तरी तरुण मुलामुलींमधील वाढती सलगी आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या पालकांसाठी डोकेदुखी ठरू लागतात. आजकाल ध्वनिप्रदूषणाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याने ठिकठिकाणचे गरबा लवकर गुंडाळले जातात. पण, त्यामुळे पालकांची डोकेदुखी संपलेली नाही. म्हणूनच नवत्रोत्सवात गुप्तहेरांच्या धंद्यालाही चांगलीच बरकत येते. बोरिवली, दहिसर, गोरेगाव, घाटकोपर, विलेपाल्रे या भागांतील अनेक लब्धप्रतिष्ठित पालक आपल्या तरुण मुलामुलींवर पाळत ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेतात. या वर्षीही दोन दिवसांपासून ते अगदी नऊच्या नऊ दिवस दहा ते बावीस हजार रुपये खर्च करून गुप्तहेरांना आपल्या मुलांवर नजर ठेवण्यासाठी पाचारण केले जात आहे.

मुंबई व उपनगरात गुजराती समाज, संकल्प दांडिया नवरात्री, कोरा केंद्र नवरात्री, नवरात्री उत्सव, फर्स्ट रोड नवरात्री महोत्सव ही प्रमुख पाच नवरात्रोत्सव मंडळे आहेत. याशिवाय अनेक छोटी छोटी मंडळेही हजारोंच्या संख्येने आहेत. या मंडळांत हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी येतात. यात अनेक मुलामुलींची मत्री होते. त्यातून सलगी वाढते. बरेचदा तरुण-तरुणी प्रेमात पडतात. त्यांच्या जोडय़ा जमतात. कधी कधी ही जवळीक शारीरिक संबंध येण्याइतपत वाढते. नवरात्रोत्सवानंतर अनेकदा गर्भपाताच्या घटनांमध्ये वाढ कशी होते, हे अनेकदा पाहणीत सिद्ध झाले आहे. याशिवाय अमली पदार्थाचे सेवन आणि वाढती गुन्हेगारी यामुळेदेखील आपली मुले या वातावरणात असुरक्षित नसल्याची जाणीव पालकांना असते. म्हणूनच पालक अनेक खासगी गुप्तहेर संस्थांची मदत आपल्या मुलांवर नजर ठेवण्यासाठी घेतात.
यंदा या खासगी गुप्तहेरांच्या शुल्कात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र असे असूनही अनेक पालकांना मुलांवर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेरीचा मार्ग प्रशस्त वाटतो.
‘हल्लीच्या काळात मुलांना रात्री नऊनंतर घराबाहेर पडू नकोस असे म्हणता येत नाही. अशा वेळी आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या मुलांच्या सहवासात असतात. त्या व्यक्तीची कौटुंबिक पाश्र्वभूमी काय आहे, तो गुन्हेगार आहे का, याची माहिती असणे यात चुकीचे काय आहे? आधुनिक काळात आपल्या संस्कृतीचे जतन करण्याची गरब्यासारख्या लोकनृत्यांची गरज आहे. मात्र कालानुरूप बदलत चाललेल्या उत्सवात संस्कृतीचा दर्जा नवीन पिढीने जपला पाहिजे,’ असे बोरिवलीचे व्यापारी रमेश पटेल यांनी सांगितले.

गैरप्रकार होत असल्यास अटकाव
नवरात्रीत आई-वडील मुलांना रात्री घराबाहेर राहण्यासाठी मोकळीक देतात. काही मुले त्याचा गरफायदा घेतात. आपल्या मुलाकडून काही गरप्रकार घडू नये म्हणून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेरांची नियुक्ती केली जाते. कधी दोन तर कधी नऊच्या नऊ दिवस नजर ठेवण्यास सांगितले जाते. यात आम्ही मुलांच्या हालचालींवर नजर ठेवतो. एखादवेळी गरप्रकार होत असल्याचे लक्षात येताच तात्काळ अटकाव केला जातो. मात्र हेदेखील पालकांच्या संमतीने केले जाते. आम्ही पालकांना चोवीस तासांनी किंवा त्यांच्या भ्रमणध्वनीवर माहिती देत असतो.
दक्षिण मुंबईतील खासगी गुप्तहेर कंपनीचा प्रतिनिधी