News Flash

राज्यात काय दिवे लावले?

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

छाया-गणेश शिर्सेकर

दिल्लीतील गोष्टींविषयी कशाला बोलता, महाराष्ट्रात तुम्ही काय दिवे लावले आहेत, त्याबद्दल सांगा, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणीची परिस्थिती असल्याचा आरोप केला. मराठा आंदोलकांना पोलीस घरात घुसून ताब्यात घेत आहेत, मारहाण करीत आहेत, असे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले, अवेळी पाऊस, अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना देशद्रोही ठरविणे, हे आणीबाणीपेक्षाही भयंकर असल्याची टिप्पणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात वाईट परिस्थिती आहे. मराठा समाजाला आंदोलनही करून दिले जात नाही. महाराष्ट्राविषयी काही बोलले की सत्ताधारी उघडे पडतात. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलन किंवा अन्य विषयांवर बोलणे सुरू आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यांना कोणीही रोखलेले नाही. पण महाराष्ट्रात मात्र मराठा आंदोलकांना पोलीस ताब्यात घेऊन तुरुंगात डांबत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

‘जनतेचे प्रश्न मांडणार’

अवेळी पाऊस, बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेला आहे. पण त्यावर चर्चाच होऊ नये, यासाठी सरकारने पळ काढला असून दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येत आहे. पहिला दिवस शोकप्रस्तावाचा असून मंगळवारी एकच दिवस सहा-सात तास कामकाज होईल. त्यात १० विधेयके सादर करण्यात आली आहेत. पण तरीही संघर्ष करुन जनतेचे प्रश्न मांडले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:01 am

Web Title: devendra fadnavis alleged that there was a state of emergency in maharashtra abn 97
Next Stories
1 करोना चाचणी आता ७८० रूपयांत
2 गुलाबी चेंडूचा अडथळा कसा पार करणार?
3 आरक्षित उमेदवारांना जातप्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र बंधनकारक
Just Now!
X