मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजाला कर्जमाफी जाहीर केली असून त्यासाठी निधी उभारणीसाठी सर्वसामान्यांनाही साद घालण्यात आली आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येकाने स्वेच्छेने खारीचा वाटा उचलला, तर मोठी गंगाजळी निर्माण होऊ शकते. या विचारातून शनिवारी सिद्धिविनायक चरणी ऑनलाइन निधी संकलनाचा ‘श्रीगणेशा’ करण्यात येणार आहे. हे केंद्र दोन दिवस सुरू राहणार असून सोमवारपासून मंत्रालय व विधान भवनातही निधी संकलन केंद्रे सुरू होणार असून पुढील टप्प्यात मॉल्समध्येही ती सुरू होतील.

सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना असून प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. ही ‘छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना’ सुमारे ८९ लाख शेतकऱ्यांसाठी असून त्यासाठी सुमारे ३४ हजार कोटी रुपये निधी लागेल, असा अंदाज आहे.  कर्जमुक्तीला सर्वसामान्यांचा हातभार लागावा, यासाठी आता मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार, प्रिया खान आदी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन काही स्वयंसेवी संस्था व मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशिक्षणार्थी या सर्वाच्या मदतीने ऑनलाइन मदत केंद्रे सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक चरणी शनिवारी श्रीगणेशा होणार आहे.

या केंद्रांवर लॅपटॉप घेऊन स्वयंसेवक असतील आणि क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून देणगी स्वीकारली जाईल. रोख रक्कम स्वीकारली जाणार नसून धनादेशाद्वारे मदत स्वीकारण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी खारीचा वाटा उचलावा आणि फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही योगदान द्यावे, असा या योजनेचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.