उस्मानाबादमध्ये शेतकरी मोर्चा काढून सरकारवर टीकास्त्र सोडणाऱया राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उस्मानाबादची जिल्हा बॅंक कोणी खाल्ली, उस्मानाबादच्या सूत गिरण्या कोणामुळे बंद पडल्या, उस्मानाबादच्या हक्काचे पाणी कोणी पळवले, याची उत्तरे राष्ट्रवादी कॉंग्रेसने द्यावीत आणि मग सरकारविरोधात मोर्चे काढावेत, असा प्रतिहल्ला फडणवीस यांनी केला. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री आणि खासदार तिथे फिरताहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी शुक्रवारी उस्मानाबादमध्ये जाहीर सभेत केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर टीका केली होती. ज्यांच्या हातात सध्या सत्ता आहे. त्यांना गरिबांचे स्मरण नाही. सरकारला अजून सूर सापडलेला नाही. असे सांगत त्यांनी सरकारविरोधात पुढच्या महिन्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी मराठवाड्यातील शेतकऱयांच्या या अवस्थेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.
संसदेच्या अधिवेशनात गोंधळ घालून कामकाज होऊ न दिल्याबद्दल त्यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. जीएसटी विधेयक रोखण्यासाठीच जाणीवपूर्वक हा गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप करून यामुळे कॉंग्रेस खासदार ४४ वरून चार वर यायला वेळ लागणार नाही, असाही टोला त्यांनी लगावला.