पुतण्या धनंजय मुंडे याचा विजय एकतर्फी होऊ नये तसेच राष्ट्रवादीलाही धडा शिकवायचा या दुहेरी उद्देशाने रिंगणात उतरलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांना सोमवारी यश आले. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी आघाडीची तब्बल १० मते फुटली. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले असले तरी मते फुटल्याने राष्ट्रवादीचा चांगलाच विचका झाला.  
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या वतीने निवडून आलेल्या आमदारकीचा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. या जागेसाठी सोमवारी पोटनिवडणूक झाली. मनसेच्या १२ जणांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता, तर चार जणांनी मतदान केले नाही. यामुळे एकूण २७३ जणांना मतदान केले व त्यातील दोन मते बाद झाली. यापैकी धनंजय मुंडे यांना १६५ तर विरोधकांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष पृथ्वीराज काकडे यांना १०६ मते मिळाली. प्रत्यक्षात युतीकडे ९६ मतांचे बळ असताना काकडे यांना १०६ मते मिळाल्याने आघाडीतील १० मते फुटल्याचे स्पष्ट झाले.
मुंडे विरुद्ध सारे
विशेष म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांनाच राजकीय धक्का देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सरसावल्याचे चित्र गेल्या काही दिवसांमध्ये दिसून येत होते.

निवडणुकीत आघाडीची १४ ते १७ मते फुटली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या मोठय़ा प्रमाणात मते फुटल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा नैतिक पराभव झाला आहे. घोडेबाजार, फोडाफोडी आणि घरे फोडण्याच्या राजकारणालाच हा धक्का आहे.
गोपीनाथ मुंडे, भाजप नेते
धनंजय मुंडे आता अधिकृतपणे राष्ट्रवादीचे आमदार होणार !