मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केलेले ८० वर्षाचे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. मुंबईत मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरु असताना आणि राज ठाकरे यांनी पक्षात धोरणात्मक बदल केले असतानाच पाटील यांनी पक्ष सोडल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर धुळ्यातून पाटील यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर केवळ चारच महिन्यांत त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कोण होते धर्मा पाटील?

धर्मा पाटील या ८० वर्षांच्या शेतकऱ्याने जमीन अधिग्रहणात गेलेल्या आपल्या जमिनीला योग्य मोबदला न मिळाल्याने न्याय मिळवण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाकडे वारंवार खेटे घातले. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेपुढे ते हतबल झाले. त्यानंतर त्यांनी थेट मंत्रालय गाठलं आणि तिथं विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भूसंपादन प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी विखरण गावातील मोबाईल टॉवर चढून आत्महत्येचा इशाराही दिला होता. दरम्यान, त्यांनी आपल्या आईसह तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात आंदोलनही छेडले होते.