‘तुम्हाला युद्धात रस नसला तरी युद्धाला तुमच्यात रस आहे’, अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे. सध्या जगातील परिस्थिती तशीच आहे. युद्धाची अनावश्यक खुमखुमी वाईटच. मात्र न्याय्य कारणांसाठी, उदात्त मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी शस्त्रसज्ज राहणे हे कोणत्याही देशाचे कर्तव्य ठरते. शस्त्रसज्जतेच्या अभावामुळे युद्धे हरल्याची किंवा सरस शस्त्रांच्या उपलब्धतेमुळे वर्चस्व गाजवल्याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात आहेत.

मानवी इतिहासात शस्त्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आदिम काळात माणूस जेव्हा जंगले आणि गुहांमध्ये राहत असे तेव्हा शस्त्रांनी त्याचे जंगली श्वापदांपासून रक्षण केले, शिकार करणे सुलभ करून त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यात हातभार लावला. पुढे माणूस एकत्र येऊन टोळ्या, गट, समाजात किंवा देशाचा नागरिक म्हणून राहू लागला तेव्हाही शस्त्रांनी त्याच्या आत्मरक्षणाचे आणि प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्याचे काम केले. एखाद्याला शारीरिक इजा किंवा अपाय पोहोचवण्यासाठी वापरलेली वस्तू किंवा युद्धात अथवा संघर्षांत प्रतिपक्षावर मात करण्यासाठी किंवा वरचष्मा मिळवण्यासाठी वापरलेली वस्तू, यंत्रणा किंवा तंत्र अशी शस्त्राची व्याख्या केली जाते.

मानवी संस्कृतीचा इतिहास बराचसा युद्धांचा इतिहास आहे. शस्त्रांनी आजवर प्रचंड उत्पात घडवून जीवित आणि वित्ताची अपरिमित हानी केली आहे, हे सत्य असले तरी त्याच शस्त्रांनी एका अर्थाने मानवाच्या विकासाला चालनाही दिली आहे. हा विरोधाभास पचनी पडण्यास थोडा अवघड असला तरी ते तितकेच खरे आहे. शस्त्रास्त्रे बनवत असताना अनेक प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले आहे आणि ते आज केवळ संरक्षण क्षेत्रात नव्हे तर जीवनाच्या अन्य नागरी क्षेत्रांतही वापरले जात आहे. त्याला ‘टॅक्टिकल टू प्रॅक्टिकल’ असे म्हटले जाते.

मानवाची समज आणि विज्ञान-तंत्रज्ञानाची जसजशी प्रगती होत गेली तसतसे शस्त्रांचे स्वरूपही बदलत गेले. साध्या दगड, गोफण, चाकू-सुरा, तलवार, कुऱ्हाड, भाला, धनुष्य-बाण यांच्या जागी बंदुकीच्या दारूच्या (गन पावडर) शोधानंतर ठासणीच्या बंदुका, रिव्हॉल्व्हर, पिस्तुले, मशीनगन आणि तोफा आल्या. या शस्त्रांनिशी लढल्या जाणाऱ्या लढायांनी पहिल्या महायुद्धापर्यंतच्या खंदकाच्या लढाईपर्यंत (ट्रेंच वॉरफेअर) उच्चतम पातळी गाठली होती. युद्धात मानवी हानीनेही उच्चांक गाठले होते. पण त्यात एक प्रकारचे साचलेपण आले होते. युद्धतंत्रातील ही कोंडी फोडण्यासाठी रणगाडय़ांचा जन्म झाला. रणगाडय़ासारख्या अस्त्राचा उगम युद्धाच्या तत्कालीन गरजेतून झाला तर विमानासारख्या शस्त्रांच्या शोधाने युद्धतंत्र बदलले. अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नाझी फौजांनी रणगाडे व लढाऊ विमानांचा एकत्रित वापर करून झंझावाती हल्ले करण्याचे तंत्र (ब्लिट्झ-क्रिग)  राबवले. तोफा-रणगाडे अशी जमिनीवरील शस्त्रे, युद्धनौका आणि पाणबुडय़ा यांसारखी पाण्यावरील आणि पाण्यातील अस्त्रे याच्या जोडीला विमाने आल्यानंतर युद्धाला तिसरी मिती मिळाली. आज कृत्रिम उपग्रहांवर लेझर शस्त्रे बसवण्यासाख्या योजनांनी (स्टार वॉर) युद्धाला चौथी मिती प्रदान केली आहे.

युद्धाच्या या कथा रम्य आहेत. पुढील वर्षभर या सदरातून दररोज एक शस्त्र आपल्यासाठी सादर केले जाईल. त्यांचा पल्ला, क्षमता, संहारकता आदी वैशिष्टय़े ही माहिती त्यात असेलच पण त्यासह त्यांच्याशी निगडित सुरस कथा, त्यांचे युद्धशास्त्रातील स्थान आणि योगदान यांचीही चर्चा असेल.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com