राज्यातील ३०० प्राथमिक आरोग्य केंद्रांवर इंटरनेट सुविधाच नाही

मुंबई : येत्या काही दिवसांत देशात लसीकरणास सुरुवात होणार असली तरी, राज्यातील १,८०० प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी सुमारे ३०० केंद्रांवर इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने समोर आले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचा वापर कसा करावा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहिला आहे. परिणामी ऑफलाइन पद्धतीने अ‍ॅपचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य विभागाने केंद्राकडे केली आहे.

लसीकरणासाठी संबंधित व्यक्तीची नोंदणी करणे, ओळख पटविणे आणि लसीकरण झाल्याची नोंद करणे इत्यादी बाबी डिजिटल पद्धतीने करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने ‘को-विन’ अ‍ॅप उपलब्ध केले आहे. परंतु हे अ‍ॅप पूर्णत: इंटरनेटवर चालत असून अनेक जिल्ह्य़ांमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचे शुक्रवारी झालेल्या लसीकरण सराव फेरीतून निदर्शनास आले. शहरातही अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा सुरळीत सुरू नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अ‍ॅप संथगतीने चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक दुर्गम भागांमध्ये मोबाइलद्वारे संपर्क साधणेही शक्य होत नाही. अशा ठिकाणी इंटरनेटवर अवलंबून असलेल्या या अ‍ॅपचा वापर कसा करणार, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

लसीकरण केंद्राची निवड करतानाच वीज आणि इंटरनेटची सुविधा असावी, असा निकष आहे. राज्यातील १,८०० प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी सुमारे ३०० केंद्रांवर इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे दुर्गम भागातल्या अशा केंद्रांना वगळून जवळील केंद्रांची निवड लसीकरणासाठी करावी लागणार असल्याची माहिती आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात निवडक केंद्रांवर लसीकरण करणे शक्य असले तरी पुढच्या टप्प्यातील लसीकरणासाठी अधिकाधिक केंद्रे उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यामुळे अ‍ॅपमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. एकाच वेळी देशभरात याचा वापर सुरू झाल्यास आणखी तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

ऑफलाइन सुविधा द्या!

अ‍ॅप ऑफलाइन पद्धतीने काम करण्यासाठी उपलब्ध करण्याची मागणी आम्ही केंद्रीय आरोग्य विभागाकडे केली आहे. जेणेकरून तेथील कर्मचारी नोंदणीसह इतर माहिती अ‍ॅपमध्ये भरतील आणि इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्यानंतर ती अपलोड केली जाईल. परंतु या मागणीला केंद्राकडून अजून प्रतिसाद मिळालेला नाही.

लसीकरणासंबंधी पुढील दोन दिवसांत बैठका आयोजित केल्या असून यात पुन्हा हा मुद्दा मांडला जाईल, असे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.