बंगला बळकावण्यासाठी दबावतंत्राचा वापर; आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार

वांद्रे, पाली हिल परिसरातील बंगला बळकावण्यासाठी बांधकाम व्यावसायिक समीर भोजवानी सातत्याने दबाव आणत आहेत, धमकावत आहेत. ते पैसा आणि ओखळींचा वापर करून खोटय़ा तक्रारी करतील आणि आम्हाला गुंतवतील, अशी तक्रार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. सायरा यांच्या तक्रारीबाबत चौकशी करून पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली.

ज्येष्ठ अभिनेते आणि सायरा बानो यांनी हा बंगला सप्टेंबर १९५३ मध्ये मूळ मालक खटाव यांच्या सहमतीने हसन लतीफ यांच्याकडून एक लाख ४० हजार रुपयांना विकत घेतला. बंगला धोकादायक बनल्याने पुनर्विकासासाठी प्रजिता डेव्हलपर्स कंपनीसोबत करार करण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या २००८मध्ये मिळाल्या. मात्र प्रजिता कंपनीने करारानुसार ठरलेल्या अटी, शर्थी पाळल्या नाहीत. त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कंपनीविरोधात न्यायालयीन वाद सुरू झाले. ऑगस्ट २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बंगल्याचा ताबा आम्हाला  द्यावा, असे आदेश कंपनीला दिले. त्यानुसार पुढल्या महिन्यात आम्ही बंगल्याचा ताबा घेतला, असा दावा सायरा यांनी तक्रारीत केला.

दरम्यान, बनावट आणि खोटय़ा कागदपत्रांआधारे भोजवानी यांनी बंगल्याचा मालकी हक्क सांगितला. तेव्हापासून आम्हाला हुसकावून बंगला बळकावण्यासाठी भोजवानी यांचे प्रयत्न आहेत. ते सातत्याने आम्हाला धमक्या देत आहेत. दबाव आणत आहेत. बंगल्यातून बाहेर पडलो नाही तर खोटय़ा तक्रारी करून गुंतवू, असेही सांगत आहेत. दिलीप कुमार ९४ वर्षांचे आहेत. मीही ज्येष्ठ नागरिक आहे. या वयात भोजवानी यांच्या दबावतंत्रामुळे आम्ही दोघे दहशतीत आहोत. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून भोजवानी यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी विनंती सायरा यांनी तक्रारीतून केली. बुधवारी सायरा यांच्या प्रतिनिधीने तक्रारअर्ज आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे सुपूर्द केला.

सायरा यांचे आरोप भोजवानी यांनी फेटाळले. खटाव हे या भूखंडाचे मूळ मालक आहेत. या भूखंडाचे अभिहस्तांतरण (कन्व्हेयन्स) आमच्या नावे आहे. तसेच हे प्रकरण २०१०पासून न्यायालयात प्रलंबित आहे. आम्ही बनावट किंवा खोटय़ा कागदपत्रांचा आधार घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया भोजवानी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.