24 January 2021

News Flash

पंचगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांना टाळे लावा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी समन्वय समिती स्थापण्याचा निर्णय

पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना थेट टाळे लावण्यात यावे व त्यांनी नियमांची पूर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करणे, विविध उपाययोजना करणे याबरोबरच या कामाच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अक्ष्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, “पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कार्यवाही तर करेलच, पण त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे प्रदूषण होते त्यांचीही ते रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी आदी ठिकाणांवरुन नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आंदोलकांवरील गुन्हे माग घेण्याबाबत सकारात्मक

पंचगांगा परिसरातील जे कारखाने नियमांचे उल्लंघन करुन नदी प्रदूषणास कारणीभूत ठरतात त्यांना थेट टाळे लावण्याची कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी पूर्तता केल्यानंतर आणि कारखान्यात तशी यंत्रणा बसविल्यानंतरच हे टाळे उघडण्यात यावे, अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांवर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रदुषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट व्हावे – पर्यावरण मंत्री

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “देशातील तथा राज्यातील बऱ्याच नद्या प्रदुषित आहेत. पण पंचगंगेच्या बाबतीत मात्र हे प्रदूषण तीव्र असल्याचे दिसते. त्यामुळे नदीतील मासे मरुन ते पाण्यावर तरंगण्यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. यासाठी पाण्यातील नेमके कोणते रासायनिक प्रदूषण, विषारी घटक कारणीभूत ठरले ते सुनिश्चित करुन ते रोखण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहेत. प्रदुषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडिट करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभागामार्फत दर महिन्याला नियमित बैठका घेऊन प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्या समन्वय समितीने वेळोवेळी आढावा घेऊन दर महिन्याच्या ५ तारखेला त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करावा, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

गावनिहाय आराखडा तयार करण्याच्या यड्रावकरांच्या सूचना

नदी प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थापन आदींसाठी गावांमध्ये ज्या यंत्रणा बसवल्या जातील त्यांच्या देखभालीचा किंवा वीजबिलाचा बोजा संबंधीत गावांवर पडू नये. यासाठी पंचगंगा नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठीचा गावनिहाय आराखडा तयार करताना निश्चित नियोजन करण्यात यावे, अशी सूचना यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली.

प्रदूषण रोखण्यासाठी २२० कोटींच्या निधीची आवश्यकता – जिल्हाधिकारी

कोल्हापूर मनपा क्षेत्रातील सांडपाणी, नदी क्षेत्रातील इतर नगरपालिका आणि १७४ गावे, एमआयडीसी, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस् आदींमधून होणारे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी साधारण २२० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गावनिहाय आणि पाईंटनिहाय आराखडा तयार करण्यास सांगितल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 9:28 am

Web Title: directly block industries that cause pollution of panchganga river cm instructions aau 85
Next Stories
1 वाई : सुट्टीवर आलेल्या जवाणाचा मारहाण करून खून
2 एफआरपीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ साखर कारखानदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
3 दोन माजी मंत्र्यांना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच
Just Now!
X