ऑस्कर पुरस्कार निवड समिती अध्यक्ष अमोल पालेकर यांचा राहुल रवैल यांना टोला
८८व्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताचे प्रतिनिधित्व चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाकडे देण्यात आल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना पुरस्कार समितीचे अध्यक्ष अमोल पालेकर आणि सदस्य राहुल रवैल यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. पालेकर यांच्या हेकेखोर स्वभावाचे कारण देत पुरस्कार समितीतून बाहेर पडलेल्या रवैल यांनी पालेकरांवर भ्रष्ट वर्तणुकीचा जाहीर आरोप केला आहे. मात्र अमोल पालेकर यांनी गेल्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचारी, हेकेखोर हे शब्द मला चिकटले नव्हते, ते आता चिकटले असल्याने आपली कारकीर्द पूर्ण झाली आहे, असा टोला लगावत रवैल यांच्या आरोपांना केराची टोपली दाखवली आहे.
‘कोर्ट’ या चित्रपटाच्या निवडीचा निर्णय ऑस्करसाठी नेमण्यात आलेल्या पुरस्कार समितीकडून जाहीर झाल्यानंतर लगेचच या समितीचे सदस्य असलेल्या दिग्दर्शक राहुल रवैल यांनी राजीनामा दिला. समितीचे अध्यक्ष असलेल्या पालेकर यांच्या हेके खोर स्वभावाला वैतागून आपण राजीनामा दिल्याचे रवैल यांनी सांगितले. गुरुवारी राहुल रवैल यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अमोल पालेकर यांनाच ‘कोर्ट’ चित्रपट नको होता, असा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. ऑस्कर पुरस्कार समितीसाठी झालेल्या स्क्रीनिंगला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला उपस्थित राहण्याची परवानगी नसते. पण यावेळी स्क्रीनिंगपासून ते बैठकीपर्यंत पालेकर यांची सहाय्यक त्यांच्याबरोबर कायम असायची. त्यांच्या सहाय्यकाने परीक्षकांबरोबर हुज्जतही घातली असल्याचा आरोप रवैल यांनी केला. अमोल पालेकरांच्या या भ्रष्ट वर्तनालाच कंटाळून आपण राजीनामा दिला असल्याचा पुनरुच्चार रवैल यांनी पत्रकार परिषदेत केला. रवैल यांच्या आरोपांना थेट उत्तर देणे अमोल पालेकर यांनी टाळले आहे. रवैल यांनी आपल्याबद्दल काय काय म्हटले आहे, याची फार माहिती नाही. जे काही कानावर आले त्यावर प्रत्युत्तर करण्याची गरज वाटत नसल्याचे पालेकर यांनी स्पष्ट केले. निवड प्रक्रियेबाबतची माहिती देण्याची परवानगी मला फिल्म फेडरेशनने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे त्याबद्दल काही बोलणार नाही. राहुल रवैल यांनी केलेल्या आरोपाबाबतीत बोलायचे तर हा दुर्दैवी प्रकार होता एवढेच मी सांगेन, असेही ते पुढे म्हणाले. अंतिमत: ‘कोर्ट’ भारताचे ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी प्रतिनिधित्व करणार आहे. या चित्रपटाला स्पर्धेत यश मिळाले आणि भारताकडे ऑस्कर पुरस्कार आलाच तर हे सगळे वादविवादही संपून जातील, असे सांगत अमोल पालेकरांनी या वादाला पूर्णविराम दिला आहे.

रवैल यांचे आरोप..
’ ऑस्कर पुरस्कार समितीसाठी झालेल्या स्क्रीनिंगला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला उपस्थित राहण्याची परवानगी नसताना पालेकर यांची सहाय्यक त्यांच्याबरोबर कायम असायची.
’ मतमोजणीच्या बाबतीत अनेक गैरप्रकार झाले. मते बदलण्यात आली, मतमोजणीच चुकीची होती, शिवाय मतांचा खोटा आकडा जाहीर करण्यात आला.