अत्यावश्यक सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे एसटी महामंडळाने  दुर्लक्ष केले आहे. एसटीत सध्या ११४ करोनाबाधित रुग्ण असून आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु महामंडळाने आकडेवारी गोळा करण्यापलिकडे कोणतीही मदत केलेली नाही. आधीच वेतनकपात, त्यात उपचारांसाठी महामंडळाकडून प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

करोनाबाधित कर्मचाऱ्यांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी एसटीत अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्तव्यावर असताना ज्या कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, त्याला नियमानुसार ५० लाख रुपयांचे अनुदानही देण्याचे स्पष्ट केले गेले. परंतु त्याबाबत अद्यापही हालचाली झालेल्या नाहीत. मुंबईसह अन्य आगारात या तीन महिन्यांच्या कालावधीत एसटीतील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगाराची पाहणी, कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना मिळणाऱ्या सुविधांची विचारपूसही के लेली नाही.

कर्मचारी संघटनांकडून नाराजी

यासंदर्भात महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी करोनाबाधित कर्मचारी संख्या व एसटी महामंडळाच्या आकडेवारीत खूपच तफावत असल्याचे सांगितले. शिवाय लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या गावी जाण्याचा अजब सल्ला दिला जात आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यांच्या औषधाचा खर्च उचलणे गरजेचे असल्याचे म्हणाले. तर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे (मुंबई) प्रादेशिक सचिव दिलीप साटम यांनी मुंबई, ठाणे विभागासह अन्य विभागात मोठय़ा प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होत आहे. ही चिंतेची बाब असून एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया दिली.

एसटीतील करोनाबाधित कर्मचाऱ्यांना रुग्णालय उपलब्ध करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होत आहेत. काही जण गावी निघून गेल्यावर करोना झाल्याचे त्यांना समजले, तर काहींनी करोना होऊनही अद्याप कळवलेले नाही. तरीही त्याचा आढावा घेत आहोत.

– शेखर चन्ने, परिवहन आयुक्त आणि एसटी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक