विधानसभेसाठी ९०० जणांचे अर्ज; २९ जुलैपासून मुलाखती

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची काँग्रेसमध्ये गर्दी वाढली आहे. ३४ जिल्ह्य़ांमधून सुमारे ९०० इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे प्राप्त झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार २९ ते ३१ जुलैदरम्यान प्रत्येक जिल्ह्य़ात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा फक्त एक उमेदवार निवडून आला. बाकी सर्वत्र मोठी पडझड झाली. निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासारखे आघाडीचे नेते भाजपमध्ये गेले. मात्र तरीही विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्यांची पक्षात गर्दी वाढली आहे. ज्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, त्यांनी प्रदेश काँग्रेसकडे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. अर्जासोबत खुल्या वर्गासाठी १५ हजार रुपये व मागासवर्गीयांसाठी १० हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. दोन जिल्ह्य़ांची अजून माहिती प्राप्त झाली नाही, मात्र ३४ जिल्ह्य़ांतून ९०० अर्ज आल्याचे सांगण्यात आले.

आता ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्या त्या  जिल्ह्य़ात जाऊन मुलाखती घेण्याचे ठरले आहे. प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ाकरिता दोन निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. २९ ते ३१ जुलै असे तीन दिवस या मुलाखती घेण्यात येतील. त्यानंतर  मुलाखतींचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्याच्या सूचना निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.