समाजमाध्यमांवर दिवाळीचा जल्लोष  शुभेच्छा संदेशांचा पाऊस

आपल्या सुखदुखाचा प्रत्येक क्षण समाजमाध्यमांतून वाटून घेणारी आजची ‘थ्री-जी’ तरुणाई दीपावलीसारख्या पारंपरिक सणाचा आनंदोत्सवही समाजमाध्यमांतूनच साजरा करीत आहे. दिवाळीच्या शुभेच्छांपासून फराळासोबतची स्वचित्रे अर्थात सेल्फीपर्यंत या सणाचा हरेक आनंद फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, हाईक, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांद्वारे आपल्या इष्ट मित्र-मैत्रिणी आणि परिवारापर्यंत पोहोचविला जात आहे. त्यातही या दिवाळीचे वैशिष्टय़ म्हणजे यंदा फराळ-स्वचित्रे मोठय़ा प्रमाणावर फेसबुक भिंतीवर चढविली जात आहेत.
फेसबुकच्या अधिकृत पाहणीतून दिवाळीचे हे आधुनिक स्वरूप समोर आले आहे. या पाहणीनुसार, सणांच्या काळात फेसबुकचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढत असून, एरवी वर्षभर फेसबुकवर फारसे न रमणारेही सणासुदीत फेसबुकच्या भिंतीवर हजेरी लावून जातात. सणासुदीला छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती आणि विविध संदेश फेसबुकच्या भिंतीवर टाकणाऱ्यांमध्ये १८ ते ३४ या वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक म्हणजे सुमारे दोन कोटींच्या आसपास आहे. बच्चे तर बच्चे पण त्यांचे माता-पिताही फेसबुकवर दिवाळी जल्लोष करताना दिसत आहेत. त्यांची संख्या सुमारे एक कोटी आहे. त्यात यंदा फराळ स्वचित्रांचा नवाच ‘ट्रेंड’ सुरू झाला असून, सामाजिक संदेश देणारे, फटाक्यांच्या प्रदूषणाविरोधातील फेसबुक गट यंदाही दिसत आहेत.
ट्विटर या लघुलेख संकेतस्थळानेही अशीच पाहणी केली असून, दिवाळीच्या विविध प्रतिमा-चित्रांपासून शुभेच्छा संदेशांच्या ट्विप्पण्यांची या संकेतस्थळावर गर्दी झाल्याचे दिसत आहे. यंदाच्या दिवाळीसाठी ट्विटरने खास ऌंस्र्स्र्८ ऊ्र६ं’्र हा हॅशटॅग सुरू केला आहे. यात अर्थातच व्हॉट्सअ‍ॅप आणि हाईकसारखी संदेशवहन माध्यमेही मागे नाहीत. तेथे तर शुभेच्छा नको, पण व्हॉट्सअ‍ॅप आवर असे म्हणायची वेळ अनेकांवर आली आहे.

विपणनाची संधी
दिवाळीच्या काळातील समाजमाध्यमांवरील तरुणाईचा वाढता वावर ही विविध कंपन्यांसाठी आयती विपणनसंधीच. तिचे सोने करण्यासाठी या कंपन्यांनी विविध कळशब्द, गुगल आणि ट्विटर ट्रेंड्स सुरू केले आहेत. ऑनलाइन खरेदीस्थळांच्या माध्यमातून तसेच फेसबुक पानांवरूनही त्यांनी संचार सुरू केला आहे.

फेसबुकचा
भारतीय चेहरा
’ तब्बल १३ कोटी २० लाख भारतीय फेसबुक वापरतात.
’ त्यातील १२ कोटी २० लाख मोबाइलवरूनच फेसबुकचा वापर करतात.
’ सहा कोटी भारतीय रोज एकदातरी फेसबुक वापरतात.
’ त्यातील पाच कोटी मोबाइलवरून फेसबुक पाहतात.
(स्रोत – फेसबुकचा पाहणी अहवाल, जून २०१५)