ढोल-ताशा वाजवणारे, त्या तालावर थिरकणारे, एकमेकांना शुभेच्छा देणारे आणि हा सर्व जल्लोष पाहण्यासाठी गर्दी करणारे अशा तरुणाईने न्हाऊन गेलेल्या वातावरणात डोंबिवलीच्या फडके रस्त्याने शनिवारी दिवाळीचे जोशपूर्ण स्वागत केले. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या सकाळी थंडीच्या सुखद गारव्यात बाजीप्रभू चौक ते गणेश मंदिर चौकापर्यंत निघालेल्या या जत्रेने दिवाळीचा आनंद शतगुणित केला.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवली शहराचे ग्रामदैवत गणेश मंदिराचे दर्शन घेण्याची गेले ५० ते ६० वर्षांची प्रथा आहे. तीच परंपरा आताची तरुण पिढी उत्साहाने पुढे नेत आहे. शहर परिसरातील तरुण, तरुणी, कुटुंबीयांनी सकाळीच फडके रस्ता गर्दीने गजबजून गेला होता. आपले मित्र, नातेवाईक, आप्तांना शुभेच्छा देण्यात प्रत्येकजण व्यग्र होता. विविधरंगी पेहरावांनी फडके रस्त्याला रंगीबेरंगी रूप आले होते. संस्कार भारतीतर्फे रस्त्याच्या मधोमध भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आपल्या मित्रांचे गटाने छायाचित्र काढण्यासाठी, रांगोळ्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी कॅमेरे  लखलखत होते. तीन ते चार तास हा तरुणाईचा उत्स्फूर्त जल्लोष फडके रस्त्यावर सुरू होता. काही राजकीय पक्षांतर्फे येथे संगीताचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
अन् त्रासही..
फडके रस्त्यावरच्या शहराचे सांस्कृतिकपण जपणारा हा पारंपरिक उत्सव आता डीजे, ढोल ताशांच्या गजरात लुप्त होतो की काय अशी भीतीही या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.