शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बँकेच्या कार्यक्षेत्रात राहात नसला तरी त्याच्या कर्जाचा अर्ज नाकारू नये, अशी सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी अन्य बँकांना केली आहे. अनेकदा बँक शैक्षणिक कर्ज मागणारा विद्यार्थी आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट करीत कर्ज नाकारतात. मात्र बँकांचा हा निर्णय योग्य नसून यापुढे बँकांनी शैक्षणिक कर्जासाठी आलेला अर्ज नाकारू नये, अशा सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने एका पत्रकाद्वारे बँकांना केली आहे. अनेक बँकांनी शैक्षणिक कर्ज नाकारल्याबद्दलच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने याप्रकरणी अन्य बँकांना कर्ज न नाकारण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबत संबंधित बँकांनी आपल्या सर्व शाखांना या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्याबाबतच्या सूचना द्याव्यात, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले. कार्यक्षेत्राबाबतची अट केवळ सरकारी मदत असणाऱ्या योजनांबाबतच कायम ठेवावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, मार्च २०१२ पर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षांत एकूण ५०२ अब्ज शैक्षणिक कर्ज देण्यात आले आहे. गेल्यावर्षी हाच आकडा ४३७ दशलक्ष इतका होता.