मुंबई : डोंगरीतल्या अत्यंत गजबजलेल्या निशाणपाडा मार्ग, जे. बी. शहा मार्ग आणि एम. ए. सारंग मार्गाच्या बेचक्यात वीतभर जागा न सोडताही उभारलेल्या इमारतींच्या भेंडोळ्यात केसरभाई मेन्शन इमारत उभी होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास मूळ इमारतीच्या मोकळ्या जागेत १५ ते २० वर्षांपूर्वी अवैधरीत्या उभारलेले चार मजले जागच्या जागी कोसळले. या दुर्घटनेला इमारतीतील वाचलेले, आसपासच्या इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांनी सर्वप्रथम मदतीचा हात दिला. कुवतीनुसार रहिवाशांनी ढिगारा उपसण्यास सुरुवात केली.

ढिगाऱ्याला चिकटून तिन्ही बाजूंनी इमारती आणि समोरच्या बाजूला दोन ते तीन फुटांच्या तांडेल क्रॉस लेन सोडून पुन्हा इमारतींची रांग. त्यामुळे ढिगारा चहूबाजूंनी इमारतींनी वेढलेला. तो उपसण्यासाठी दुतर्फा फुटणाऱ्या तांडेल क्रॉसलेन उपलब्ध होता. त्याच्याही दोन्ही बाजूंना दुचाकी आत शिरू नयेत म्हणून लोखंडी पाइप बसवलेले. त्यामुळे बचावकार्याची सुरुवात पाइप कापण्यापासून झाली. तोपर्यंत स्थानिक रहिवासी आपापल्या क्षमतेनुसार ढिगाऱ्यातील काँक्रीटचे तुकडे, लोखंडी खांब, लाकडी वस्तू, माती उपसून बाजूला टाकत होते. तांडेल क्रॉसलेनमध्ये शंभर ते दीडशे रहिवाशांची मानवी साखळीच तयार करण्यात आली होती. चादरी, लुंग्या, गोधडय़ा अशा मिळेल त्या कापडात किंवा भांडय़ात ढिगाऱ्यातील अवशेष उचलून बाहेर फेकले जात होते.

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) दाखल झाल्यानंतर बचावकार्य जलदगतीने होण्याची आशा होती. एनडीआरएफकडे ढिगारा उपसण्याची, धातूच्या वस्तू कापण्याची, फोडण्याची, ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना प्राणवायू पुरवण्याची अद्ययावत सामग्री होती; पण या यंत्रसामग्रीचा स्वैर वापर करण्यासाठी जागा नव्हती. एका बेचक्यात ढिगारा होता. चहूबाजूंनी खेटलेल्या इमारतींमुळे यंत्रसामग्रीचा वापर मर्यादित राहिला. त्यात दुपापर्यंत बचावकार्यात जुंपलेल्या स्थानिक हातांचे कौतुक वाटत होते; पण नंतर तेच हात ओझे ठरू लागले. एनडीआरएफ जवानांसोबत स्थानिक रहिवाशांनी ढिगाऱ्यावर गर्दी केली होती. त्यामुळे ढिगारा आणखी दबत होता, त्याखाली दबलेल्यांना प्राणवायू मिळण्याची संधी धूसर होऊ लागली होती. एका क्षणी एनडीआरएफलाच काम करू द्या, बाकीच्यांनी बाहेर व्हा, या

स्थानिक रहिवाशांमधल्याच एकाने केलेल्या सूचनेवरून तणावही निर्माण झाला.

जागाच नसल्याने ढिगारा तिथल्या तिथे बाजूला करणे शक्य नव्हते. तो चिंचोळ्या मात्र लांबलचक तांडेल क्रॉस लेनच्या दोन्ही तोंडांवरील मोकळ्या जागेत टाकणे भाग होते. त्यात बराच वेळ वाया गेला आणि बचावकार्य मंदावले.

मदत करणारे हात जखमी

पोलीस अपघातानंतर काहीच वेळात घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्निशमन दलाची तुकडी अर्ध्या तासाने आली. एनडीआरएफचे पथक तर सव्वा वाजण्याच्या सुमारास म्हणजे तब्बल अडीच तासांनी घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ तुकडी येईपर्यंत स्थानिकांनी सहा जणांना ढिगाऱ्याखालून काढून जेजे आणि अन्य रुग्णालयांमध्ये रवाना केले. या प्रयत्नांत अनेक रहिवासी जखमीही झाले. कोणाचे हात कापले, कोणी धडपडले, ठेचकळले. मात्र ओघळणारे रक्त आणि वेदनेची तमा न करता बेभान रहिवाशांचे अविश्रांतपणे ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.

नातेवाईकांना धीर

दबलेल्या कुटुंबातील बाहेर असलेल्या नातेवाईकांना धीर देणे हाही बचावकार्याचाच एक भाग होता. या परिसरातील ज्येष्ठ, अनुभवी मंडळींनी ती बाजू नेटाने लावून धरली होती. तांडेल क्रॉस लेनच्या दुतर्फा जमलेल्या बघ्यांची गर्दी पांगवणे, रुग्णवाहिकांसह पोकलेनना वाट करून देणे, घटनास्थळी दाखल महत्त्वाच्या व्यक्तींना जागा करून देणे, ही जबाबदारीही अचूकरीत्या हाताळली जात होती.