13 August 2020

News Flash

नाल्यांतून यंदा जास्त गाळउपसा

पावसाळ्यात कचरा अडकून नाले व पर्यायाने शहर तुंबू नये यासाठी महापालिका पावसाळ्याआधी नाल्यांमधील सरासरी एक फुटापर्यंतचा गाळ बाहेर काढते.

गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक गाळ काढण्याचे आदेश

दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नालेसफाई करूनदेखील पावसाळ्यात नाले तुंबत असल्याच्या पाश्र्वभूमीवर यंदा मुंबई महापालिकेने नाल्यांमधून जास्त गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा नदी-नाल्यांमधून २५ टक्के अधिक गाळ काढण्याचे आदेश पालिकेने कंत्राटदारांना दिले आहे. यामुळे यंदा नाले अधिक मोकळे होतील व पावसाचे पाणी अधिक वेगाने त्यातून प्रवाहित होईल, असा पालिका अधिकाऱ्यांचा दावा आहे. उपसलेल्या गाळाचे वजन करण्यासाठी जकात नाक्यांवर वजनकाटे व सीसीटीव्ही यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामात पारदर्शकता येऊन ते अधिक चांगले होण्याचा प्रशासनाला विश्वास आहे.

‘नदीचे मूळ, ऋषीचे कूळ’ विचारू नये असे म्हणतात. त्याचप्रमाणे मुंबईच्या नाल्यांमधील गाळ नेमका किती हा आतापर्यंत अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. पावसाळ्यात कचरा अडकून नाले व पर्यायाने शहर तुंबू नये यासाठी महापालिका पावसाळ्याआधी नाल्यांमधील सरासरी एक फुटापर्यंतचा गाळ बाहेर काढते. त्याचे वजन साधारण चार लाख टनांपर्यंत भरते. प्रत्येक ट्रकमध्ये सरासरी १४ टन गाळ वाहून नेला जात असल्याचा विचार करता सुमारे ३० हजार ट्रक भरून गाळ बाहेर काढला जातो. मात्र तरीही काही भागांत पाणी साचण्याचा पूर्वानुभव लक्षात घेता पालिकेने या वेळी तब्बल २५ टक्के जास्त गाळ बाहेर काढण्याचे ठरवले आहे. म्हणजेच या वेळी गाळाने भरलेल्या ट्रकच्या ३७ हजारांपेक्षा अधिक फेऱ्या ५ लाख २१ हजार मेट्रिक टन गाळ वाहून नेणार आहेत.

नाल्यांमधील १०० टक्के गाळ खरवडून काढण्याची गरज नसते. पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी वाहते राहावे इतपत गाळ काढला जातो, असे पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता विद्याधर खंडकर यांनी सांगितले. पूर्वानुभवानुसार प्रत्येक विभागातील अभियंत्याकडून नाल्यांमधून किती गाळ काढायला हवा त्याची माहिती येते. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी २५ टक्के अधिक गाळ काढण्याचे ठरले आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्याआधी यातील ६० टक्के गाळ काढला जातो. पावसाळ्यात वीस टक्के, तर पावसाळ्यानंतर २० टक्के गाळ काढणे अपेक्षित असते. मात्र या वेळी पावसाळ्याआधीच ७० टक्के गाळ काढला जाईल, असे खंडकर म्हणाले. मोठय़ा नाल्यांप्रमाणेच लहान नाले व गटारे यामधील गाळ काढण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

गाळ कुठे जातो?

शहराबाहेर जागा शोधून गाळ टाकण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. वसई, भिवंडी व उरण येथे हा गाळ टाकला जात असून सध्या शहरातून दररोज १४ ते १८ हजार मेट्रिक टन गाळ असलेल्या ट्रकच्या हजार ते बाराशे फेऱ्या होणे अपेक्षित आहे.  पाच खासगी ठिकाणी ट्रकचे वजन करून पावत्या घेतल्या जातात.

दीडशे कोटींची कंत्राटे

वर्ष २०१६ पासून प्रतिमेट्रिक टन गाळ काढून तो शहराबाहेर टाकून येण्यासाठी १६०९ रुपये शुल्क पालिकेकडून दिले जाते. एका ट्रकमध्ये साधारण १४ टन गाळ भरला जातो असे लक्षात घेतले, तर एका ट्रकमागे पालिकेला २२ हजार रुपये अधिक कर असा २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. मोठय़ा नाल्यांमधील ५ लाख टन आणि लहान नाले, गटारे यामधील सुमारे २ लाख टन गाळ काढण्यासाठी पालिकेने या वर्षी सुमारे दीडशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची कंत्राटे दिली आहेत. आधीच्या  गेल्या तीन वर्षांत प्रतिटन गाळ काढण्याचा भाव सारखाच ठेवण्यात आला असला तरी या वर्षी नाल्यांमधील गाळावर अधिक खर्चही होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2018 1:05 am

Web Title: drain mud cleaning
Next Stories
1 पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त?
2 भारताच्या ऐतिहासिक सर्वेक्षणाचा साक्षीदार मुंबईत
3 कचऱ्याचे उत्तर शोधण्यासाठी राज्यांचे दौरे
Just Now!
X