पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा पालिका प्रशासनाचा दावा

गतवर्षीच्या तुलनेत यंदा नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत मोठय़ा नाल्यांची सुमारे ६३.२८ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३९.५० टक्के नालेसफाई झाली होती. छोटय़ा नाल्यांची सफाई पालिकेच्या  वेळापत्रकानुसार सुरू असून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होतील, असाही दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील मोठय़ा नाल्यांमधून तब्बल १ लाख ७६ हजार २३२ मेट्रीक टन गाळ काढण्याचे उद्दीष्ट पालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे. १३ मेपर्यंत या नाल्यांमधून १ लाख ११ हजार ५२७ मेट्रीक टन गाळ  उपसून वाहून नेण्यात आला असून तो ६३.२८ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी १ लाख ७२ हजार ९८० मेट्रीक टन गाळ नाल्यांतून काढण्यात येणार होता.

मेच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत त्यापैकी ६८ हजार ३३४ मेट्रीक टन गाळ काढण्यात आला होता. गेल्या वर्षी या कालावधीत सुमारे ३९.५० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले होते, अशी माहिती पालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक तसेच पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी दिली.

मेच्या दुसऱ्या आठवडय़ाच्या अखेपर्यंत शहरातील मोठय़ा नाल्यांमधून ७ हजार ८२ मेट्रीक टन (४१.६२ टक्के) गाळ काढण्यात आला असून गतवर्षी याच कालावधीत २४.८० टक्के गाळ काढला होता.

पश्चिम उपनगरांमध्ये ६४ हजार १२० मेट्रीक टन (६५.५९ टक्के), तर पूर्व उपनगरांमध्ये ४० हजार ३२५ मेट्रीक टन (६५.६२ टक्के गाळ काढून कचराभूमीमध्ये टाकण्यात आला. गेल्यावर्षी हे प्रमाण अनुक्रमे ५०.३२ टक्के व २८.८२ टक्के इतके होते. मिठी नदीमधील गाळ काढून वाहून नेण्याचे काम प्रगतीपथावर असून १३ मेपर्यंत ५२.५२ टक्के काम पूर्ण झाले  आहे, असेही लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले.

छोटे नाले आणि रस्त्यालगतच्या वाहिन्यांची सफाई पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्यात येत आहेत. छोटय़ा नाल्यांसाठी ३ लाख ७० हजार ९५४ मनुष्य दिवसांचा, तर रस्त्यालगतच्या वाहिन्यांची सफाई २ लाख ४१ हजार ५४६ मनुष्य दिवसांची उपलब्धता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही कामेही प्रगतीपथावर असल्याचा दावा लक्ष्मण व्हटकर यांनी केला आहे. नालेसफाईचा अहवाल यापुढे दर सोमवारी पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.