गृह राज्यमंत्र्यांची माहिती; विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न उधळणार

मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ्यांच्या जाळ्यात ओढण्याचा माफियांचा प्रयत्न आहे. एमडीसारख्या काही अमलीपदार्थाचे राज्यात उत्पादनही केले जात असल्याची कबुली गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. या तस्करीची पाळेमुळे शोधून ती समूळ नष्ट केली जाईल. तस्करांना कठोर शिक्षा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अमलीपदार्थाच्या तस्करांकडून मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाण्याबाबतचा प्रश्न बाबुराव पाचर्णे यांनी उपस्थित केला. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार आदींनी अमलीपदार्थाच्या माध्यमातून राज्यातील तरुण पिढी बरबाद होण्याचा धोका सभागृहाच्या निदर्शनास आणला. कोकेन आणि हेरॉईनइतकेच आरोग्याला अपायकारक असलेले एमडीसारखे तुलनेने स्वस्त अमलीपदार्थ विकण्यासाठी तस्करांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढले आहे. कोकेन आणि हेरॉनची बाजारातील किंमत प्रति ग्रॅम १२ हजार रुपयांच्या आसपास असून त्या तुलनेत एमडी १२०० रुपये ग्रॅम अशा स्वस्त किमतीत मिळते. शिवाय ते गोळ्या, इंजेक्शन किंवा पावडरीच्या स्वरूपातही घेता येत असल्याने त्याची तस्करी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. राज्यातही या अमलीपदार्थाचे उत्पादन होत असल्याची बाब समोर आली आहे.

या तस्करीसंदर्भात नॅशनल क्राईम ब्युरोने कारवाई करून आंतरराज्यीय स्तरावर सुरू असलेले जाळे तोडून गुन्हेगारांना अटक केली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने एनडीपीसी कायद्यात दुरुस्ती करून एमडी हे अमलीपदार्थाच्या यादीत समाविष्ट केले आहे. तसेच गुन्हेगारांना १० ते २० वष्रे शिक्षा तसेच एक ते दोन लाखांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आल्याचेही राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

अमलीपदार्थाच्या तस्करीचे अनेक राज्यांतील जाळे तोडण्यात शासनाला यश आले आहे. त्यामुळे अमलीपदार्थाच्या तस्करीवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. ही तस्करी समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली असून, पाच युनिट स्थापन केली आहेत. अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले असून, कायद्यानुसार कडक कारवाई करून लवकरच यावर नियंत्रण आणण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगला

मुंबई:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा देण्याबाबतचे विधेयक विधानसभेत मंगळवारी एकमताने मंजूर झाले. महापौर बंगला ही पालिकेची मालमत्ता असल्याने त्याचा वापर स्मारकासाठी करण्यास परवानगी देण्याबाबत सरकारने अध्यादेश जारी केला होता. त्याबाबतच्या विधेयकास विधानसभेने मंजुरी दिली.