News Flash

दुखापतग्रस्तांमध्ये २० टक्क्यांनी वाढ

अस्थिभंग, पाठ, कंबरदुखीच्या तक्रारी; तरुण वर्गाचे प्रमाण सर्वाधिक

(संग्रहित छायाचित्र)

खड्डेजाच

रस्त्यांवरील मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे दुखापत झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास २० टक्क्यांनी वाढली असून यामध्ये तरुण वर्गाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्डय़ांचा अंदाज येत नाही. अशा वेळी गाडीचे चाक खड्डय़ांत गेल्यास प्रवासी जखमी होतात. त्यामुळे हाताला अस्थिभंग होणे, पाय मुरगळणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या पावसाळ्यात वाढते. यंदाही हे प्रमाण जास्त आहे. त्यात मोटारसायकलस्वारांची संख्या अधिक आहे.

खड्डय़ांमुळे अपघात होऊन जखमी झालेले किमान दोन रुग्ण दर आठवडय़ाला रुग्णालयात येतात. त्यामुळे मणक्याचे आजार असणाऱ्या किंवा वयस्कर व्यक्तींना आम्ही रिक्षा किंवा मोटारसायकलवरून प्रवास करणे टाळण्याचा सल्ला देतो. वयस्कर व्यक्तींची हाडे ठिसूळ झालेली असतात. अशा वेळी रिक्षा किंवा बसचे चाक खड्डय़ातून गेल्यास त्यांना अस्थिभंग होतो. असे अपघात पूर्वी घडले असल्याचे शीव लोकमान्य टिळक रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. ए. बी. गोरेगावकर यांनी सांगितले.

खड्डय़ांमधून वारंवार प्रवास केल्याने मान, पाठ, कंबर आणि पायाच्या सांध्यांमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आणताना जे. जे. रुग्णालयाचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एकनाथ पवार म्हणाले, ‘‘मोटारसायकलचा तोल गेल्याने पुढच्या चाकाजवळील बंपर लागूनही अनेकांना दुखापत होते. धक्क्यांमुळे पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होणारे आठवडय़ातून किमान ४० ते ५० रुग्ण रुग्णालयात येतात. त्यांत कल्याण, डोंबिवलीचेही रुग्ण असतात. पनवेल-गोवा महामार्गावरही खड्डय़ांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गावरील खड्डय़ांमुळे झालेल्या अपघातील किमान दोन रुग्ण दर आठवडय़ातून जे. जे.मध्ये येतात.’’

खड्डय़ांमुळे पायी चालणाऱ्यांचेही अपघात होतात. त्यांत जखमी होणाऱ्यांमध्ये वयोवृद्धांचे प्रमाण अधिक आहे. चालताना खड्डय़ांमुळे तोल जाऊन पाय मुरगळणे, घोटय़ाजवळ सूज येणे, अस्थिभंग होणे असे प्रकार होतात, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

मूत्रसंसर्गाच्या तक्रारी

खड्डय़ांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे वाढलेला प्रवासाचा वेळ यामुळे मूत्रसंसर्गाच्या समस्याही मोठय़ा प्रमाणात बळावतात. एक ते दीड तासांहून अधिक काळ लघवी रोखल्याने संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून येत असल्याचे मूत्ररोगतज्ज्ञ सांगतात. यामध्ये प्रामुख्याने महिलांचे प्रमाण अधिक आहे. लघवी रोखून धरल्यास पोटात दुखणे, मूत्रमार्गाचे संसर्ग होण्याची शक्यता असते. वयस्कर व्यक्तींनी लघवी अधिक काळ रोखून धरल्यास लघवी बंद होण्याचा संभव असतो. शिवाय, मूत्राशयातील लघवीच्या उर्त्सजनाची क्षमता कमी होते, असे डॉक्टरांनी सांगितले.

खड्डय़ांवरून सुमित राघवनचा आदित्य ठाकरेंना टोला

खड्डय़ांवरून सार्वत्रिक क्षोभ व्यक्त होत असताना अभिनेता सुमित राघवन याने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनाच ट्विटरवरून टोला लगावला. राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदित्य ठाकरे यांनी हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची असे ट्वीट केले. ही संधी साधत सुमित राघवनने आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटवर प्रतिसाद देत, ‘नव्हे नव्हे नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल’, असा टोला लगावला. तसेच ‘येरे माझ्या मागल्या’ असा हॅशटॅग दिला.

शरीरव्याधींची भीती

खड्डय़ांमुळे मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास होतो. मणक्याच्या हाडांची लवकर झीज होते. मणक्यांमधील गादी सरकण्याची शक्यता असते. लांबचा प्रवास दुचाकीवरून करणाऱ्यांना मणक्याच्या तक्रारी उद्भवतात. खड्डय़ांमधून गाडी वेगात गेल्यास मागच्या सीटवरील व्यक्तीला मोठय़ा प्रमाणात धक्का बसतो. दुचाकी किंवा बसच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींचाही अस्थिभंग होण्याची शक्यता असते.

काळजी घ्या!

* जोरदार पावसातून मोटारसायकलचा प्रवास टाळावा.

* पावसाळ्यात लहान मुलांना घेऊन मोटारसायकल प्रवास करूच नये.

* पावसाळ्यात मोटारसायकलवरून प्रवास करताना गचके टाळण्यासाठी वेग कमी ठेवा.

* पावसाळ्यात चालताना शक्यतो चप्पल किंवा सँडल न घालता स्पोर्ट्स शूज वापरावेत.

खड्डय़ांमुळे १६६ जणांचा बळी

राज्यात खड्डय़ांमुळे २०१८ मध्ये ५५२ अपघात झाले. त्यांत १६६ जणांचा मृत्यू, तर ५४८ जण जखमी झाले. यात मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातच १११ अपघात झाले असून त्यांत सहा जण ठार आणि १२८ जण जखमी झाले.

सर्वाधिक अपघात

ठिकाण    अपघात    मृत्यू जखमी

बुलढाणा    ७४   ३०  ८०

लातूर ६४   १९   ४९

सोलापूर    ८२   २८   १०५

नागपूर शहर १११  ६    १२८

ठाणे ग्रामीण     २२   ११   २५

ठाणे शहर  ५    ३    २

नवी मुंबई  ३४   ११   २५

पुणे ग्रामीण १९   १०   १६

मुंबई १    २    —

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 2:07 am

Web Title: due to bad roads injuries increase by 20 abn 97
Next Stories
1 ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र
2 ‘शोधइंडियाडॉटकॉम’विरोधात पोलीस तक्रार
3 भाजप कमी जागांवर सेनेला झुकवणार
Just Now!
X