16 February 2019

News Flash

कचरा इथला संपत नाही!

सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा तीन सत्रांमध्ये पालिकेकडून या परिसराची सफाई करण्यात येते.

(संग्रहित छायाचित्र)

दादरच्या मंडईतील अस्वच्छतेमुळे स्थानिक हैराण

भल्या पहाटे सुरू होणारी गजबज, मालवाहू ट्रकमुळे होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यावरच फेकण्यात येणारा खराब भाजीपाला, त्यामुळे निसरडा बनलेला रस्ता, दरुगधी आणि आरोग्याचा प्रश्न अशा समस्यांमुळे दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईच्या आसपासच्या भागांत राहणारे रहिवासी हैराण झाले आहेत. दादरच्या सेनापती बापट मार्गावरून थेट न. चिं. केळकर मार्गापर्यंत विस्तारलेल्या या मंडईच्या अस्वच्छतेमुळे अवघा परिसर बकाल झाला आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे.

दादर रेल्वे स्थानकाजवळून (पश्चिम) जाणारा सेनापती बापट मार्ग आणि प्लाझा चित्रपटगृहाजवळील परिसर भल्या पहाटे ४ वाजल्यापासून भाजीपाला घेऊन येणारे ट्रक आणि टेम्पोच्या वर्दळीमुळे गजबजून जातो. पहाटे ४ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत किमान ४०० च्या आसपास ट्रक भाजीपाला घेऊन येत असतात. याशिवाय छोटय़ा भाजीविक्रेत्यांचा माल वाहून नेणाऱ्या गाडय़ांचीही येथे वर्दळ असते. ट्रकमधून येणारा माल रस्त्यावरच उतरवला जातो आणि तेथेच त्याची विक्री होते. त्यातून खराब झालेला भाजीपाला तेथेच फेकून दिला जातो. त्यामुळे येथील पदपथ आणि रस्ता नेहमी कुजलेल्या भाजीपाल्याने बरबटलेला दिसतो. त्यातून वाट काढतच पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागते. मंडई परिसरातून जाणारा सुभाष विठ्ठलराव खेमकर मार्ग, सेनापती बापट मार्ग आणि न. चिं. केळकर मार्गाला जोडला जातो. खेमकर मार्गावर काही चाळी आणि टॉवर असून तेथे मोठय़ा संख्येने रहिवासी वास्तव्यास आहेत. मंडईतील अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी यामुळे या भागातील रहिवासी हैराण झाले आहेत. अस्ताव्यस्त फेकून देण्यात आलेला नाशवंत भाजीपाला कुजल्यामुळे रस्ता निसरडा होतो आणि रहिवाशांना छोटय़ा-मोठय़ा अपघातांना सामोरे जावे लागते. कुजलेल्या भाजीपाल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते.

सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा तीन सत्रांमध्ये पालिकेकडून या परिसराची सफाई करण्यात येते. पालिकेची कचरावाहू गाडी दररोज सकाळी ९ च्या सुमारास मंडई परिसरात येते आणि रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्यात येतो. मात्र सतत भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांची रीघ मंडईत लागलेली असते. त्यामुळे या रस्त्यावर पडणारा कचरा काही संपत नाही. पालिका कामगारांनी रस्त्याची साफसफाई केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पुन्हा रस्त्याला बकाल रूप येते.

या मंडईमध्ये भाजीपाल्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा पालिकेच्या बाजार विभागाचा मानस आहे. मंडईमध्ये खतनिर्मिती यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे बाजार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमध्ये दिवसभरात मोठय़ा प्रमाणावर भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे या मंडईत दररोज भाजीपाल्याचा सुमारे १६ ते १८ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या मंडईमध्ये दररोज नित्यनियमाने तीन पाळ्यांमध्ये पालिकेमार्फत सफाई केली जाते.

-अशोक खैरनार, साहाय्यक आयुक्त-जी उत्तर विभाग

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त अलीकडेच मंडईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालिका आयुक्त उपस्थित होते. आयुक्त येणार असल्यामुळे मंडई आणि आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवसापासून ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. आयुक्तांनी आठ दिवसात हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले आहे.

-अजित पडवळ, स्थानिक रहिवासी

First Published on August 24, 2018 3:10 am

Web Title: due to the uncleanness of dadars mandai the local bored