|| प्रसाद रावकर

नाना चौक, परळ, हिंदमाता, भायखळ्याच्या सखल भागांत पालिकेचा पुन्हा अभ्यास

मुंबई : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत केलेल्या कामांची मलमपट्टी व्यर्थ ठरल्याचे दिसून येत असल्याने नाना चौक, लालबाग, परळ, हिंदमाता, भायखळा यांसह अन्य भागांमध्ये पालिके ने पुन्हा एकदा अभ्यास करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पालिकेच्या डी, एफ-दक्षिण आदी विभागांनी घनकचरा व्यवस्थापन आणि पर्जन्य जलवाहिनी खात्यांतील अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत आणि प्रत्यक्ष ठिकाणांची पाहणी करून तोडगा काढण्यावर भर दिला आहे.

मुंबईमध्ये ४-५ ऑगस्टला पडलेल्या मुसळधार पावसाने आजपर्यंत कधीच पाणी न साचलेला दक्षिण मुंबईतील परिसर जलमय झाला. मंत्रालय, चर्चगेट, गिरगाव चौपाटी, गिरगावमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास बराच वेळ लागला. त्यानंतर २२-२३ सप्टेंबरला पावसामुळे पुन्हा सखल भाग जलमय झाले. पाण्याचा निचरा होण्यास आठ ते दहा तासांचा कालावधी लागला. या दरम्यान समुद्राला भरती आल्याचे कारण पालिका अधिकाऱ्यांकडून पुढे करण्यात येत असले तरी पालिके ने चिंचपोकळी, लालबाग, परळ, भायखळा, नळबाजार, ग्रॅन्ट रोड, वरळी आदी परिसरांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.

२६ जुलै २००५नंतर पालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत काही कामे हाती घेतली. मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, क्लिव्ह लॅण्ड, हाजी अली, इर्ला, लव्हग्रो, ब्रिटानिया, गझधरबांध, मोगरा आणि माहुल येथे उदंचन केंद्र उभारण्याचा, तसेच पर्जन्य जलवाहिन्यांचे बळकट असे जाळे उभारणे आदी कामे हाती घेण्यात आली. सहा उदंचन केंद्रे कार्यान्वित झाली. मिठी नदीचे खोलीकारण, रुंदीकरणाची कामे पूर्ण झाली. पण पावसाळ्यात सखल भाग जलमय होऊन मुंबईकरांना मनस्ताप सहन करावाच लागत आहे.

मुंबई सेंट्रलमध्ये भरतीमुळे पाण्याचा निचरा नाही

दरवर्षी मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबई सेंट्रलमधील मराठा मंदिर चित्रपटगृहाच्या आसपासचा परिसर जलमय होतो. तसा तो बुधवारीही झाला. परंतु संततधार पडणाऱ्या पावसाने नायर रुग्णालयातील बाह््यरुग्ण विभाग जलमय झाला. त्याच वेळी समुद्राला मोठी भरती. भरतीचे पाणी शहरात शिरू नये म्हणून उदंचन केंद्रांचे दरवाजे बंद करावे लागतात. परिणामी, या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, असे ‘ई’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी सांगितले.

नाना चौकाचे कोडे

पावसाळ्यात जलमय होणाऱ्या ग्रॅन्ट रोडच्या नाना चौक परिसरासाठी हाजी अलीत उदंचन केंद्र उभारण्यात आले. परंतु, नाना चौकमध्ये बुधवारी साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सात-आठ तास लागले. आता पुन्हा नाना चौक परिसराचा अभ्यास करून उपाययोजना करण्याचा विचार सुरू आहे. ‘नाना चौक परिसर सखल भागात आहे. त्या तुलनेत आसपासचा परिसर उंच आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडू लागताच नाना चौक परिसरात पाणी साचते. साधारण २५ मिलिमीटर पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता पर्यन्य जलवाहिन्यांमध्ये आहे. त्यापेक्षा अधिक पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो,’ असे ‘डी’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

हिंदमाता, लालबाग-परळ पाण्याखालीच

हिंदमाता, लालबाग, परळ, चिंचपोकळी भागांतही बुधवारी साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास बराच काळ लागला. हिंदमाता परिसरात साचणाऱ्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र या भागाला पावसाळ्यात जलमुक्ती देण्यास पालिकेला यश आलेले नाही. ‘हिंदमाता, लालबाग, परळमधील पावसाचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून ब्रिटानिया उदंचन केंद्रातून समुद्रात सोडले जाते. परंतु भायखळ्यामध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ न शकल्यामुळे हिंदमाता, लालबाग, परळ भागांत पाणी साचून राहिले. हा प्रकार का घडला याचा अभ्यास करण्यात येणार आहे,’ असे ‘एफ-दक्षिण’ विभाग कार्यालयाच्या साहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी सांगितले.