दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर तसेच ठाणे-नवी मुंबईकडे सुलभ ये-जा करणाऱ्यांसाठी रामबाण उपाय ठरलेल्या पूर्व मुक्तमार्गावरील सुसाट गतीला आता वेसण बसणार आहे. वाहनचालकांना लवकरच या मार्गावरही वाहतूक कोंडीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई पोलिसांच्या कडाडून विरोधानंतरही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हट्टासमोर झुकत पूर्व मुक्तमार्ग अवजड वाहनांसाठी खुला करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच ठाणे आणि नवी मुंबईकडे ये-जा करणाऱ्यांसाठी पर्यायी सोयीचा मार्ग म्हणून ‘एमएमआरडीए’ने दक्षिण मुंबईतील पी-डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट ते घाटकोपरदरम्यान पर्यायी पूर्व मुक्तमार्ग बांधण्याचे काम हाती घेतले असून पहिल्या टप्प्यातील ऑरेंज गेट ते पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्यापर्यंतचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना अत्यंत अवघ्या दहा मिनिटांमध्ये मुंबईतून बाहेर पडता येते. परिणामी छोटय़ा वाहनांसाठी अत्यंत उपयुक्त असा पूर्व मुक्तमार्ग मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांसाठी वरदान ठरला आहे. मात्र आता याही मार्गावरून अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याने नवी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  या प्रकल्पासाठी नाममात्र दराने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

०१     मुंबई पोलिसांच्या कडाडून विरोधानंतर पोर्ट ट्रस्टच्या हट्टासमोर सरकार झुकले. 
०२    सरकारच्या निर्णयामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार.
०३    पूर्व मुक्तमार्गावरील सुसाट गतीला आता वेसण बसणार.