करोनामुळे विकास दर उणे आठ टक्के 

कर्जाचा बोजा पाच लाख कोटींवर

करोना आणि त्यातून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्याला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षांत विकास दर उणे ८ टक्के इतका घटला आहे. कृषी क्षेत्र वगळता बांधकाम, निर्मिती, उद्योग, सेवा या सर्वच क्षेत्रांमध्ये यंदा पीछेहाट झाली.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये सादर के लेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या अर्थव्यवस्थेचे बिकट चित्र समोर आले. करोनाची साथ, टाळेबंदी आणि टप्प्याटप्प्याने निर्बंध दूर करण्यात आल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आणि आर्थिक गाडी रुळावरून घसरली. ही गाडी पुन्हा रुळावर आलेली नाही, हेच या अहवालातून स्पष्ट झाले. केंद्राप्रमाणेच राज्याच्या तिजोरीला फटका बसला आहे.

सेवा क्षेत्रात राज्यात गेले काही वर्षे चांगली प्रगती झाली होती. गेले दशकभर सेवा क्षेत्रात विकास दर वाढत होता. यंदा प्रथमच सेवा क्षेत्रातील विकास दर घटला आहे. सेवा क्षेत्रात उणे नऊ टक्के विकासाचा दर असेल. २०१९-२० या आर्थिक वर्षांत विकासाचा दर ८.१ टक्के होता. यंदा मात्र यात मोठय़ा प्रमाणावर घट होऊन हा दर ९ टक्के झाला.  करोनामुळे बांधकाम, निर्मिती, उद्योग आदी सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांना त्याचा फटका बसला.

दरडोई उत्पन्नातही मोठय़ा प्रमाणावर घट झाली. दहा वर्षांनंतर प्रथमच राज्याचे दरडोई उत्पन्न कमी झाले. देशातील आघाडीचे राज्य असलेले महाराष्ट्र हे दरडोई उत्पन्नात सहाव्या क्र मांकावर मागे पडले. याचबरोबर कर्जाचा बोजा हा पाच लाख कोटींवर गेला. चालू आर्थिक वर्षांत गतवर्षांच्या तुलनेत यंदा १ लाख ५६ हजार कोटींनी राज्याचे सकल उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी उपयोगी पडलेल्या पाच रुपयांमध्ये भोजन पुरविणाऱ्या शिवभोजन थाळीचा २ कोटी ८१ लाख लोकांनी लाभ घेतला.

महत्त्वाच्या क्षेत्रांत पीछेहाट

निर्मिती क्षेत्र  -११.८ टक्के

उद्योग  -११.३ टक्के

सेवा क्षेत्र -९ टक्के

बांधकाम  -१४.६ टक्के

व्यापार, हॉटेल्स व उपाहारगृहे, दळणवळण -२० टक्के

अर्थवर्षांचा अंदाज..

चालू आर्थिक वर्षांत चांगल्या पावसाने फक्त कृषी आणि कृषी क्षेत्रावर आधारित उद्योगांमध्येच प्रगती बघायला मिळाली. बाकी सर्वच क्षेत्रांमध्ये उणे विकास दर असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

दिलासा कृषीचा..

चांगल्या पावसामुळे खरीप हंगामात चांगली पिके आली. त्यातूनच कृषी आणि कृषी आधारित क्षेत्रात ११.७ टक्के  विकास दर असेल. राज्याची सुमारे ५० टक्के  लोकसंख्या शेती किं वा यावर आधारित उद्योगांवर अवलंबून असताना या क्षेत्रात चांगले चित्र असल्याने राज्यासाठी तेवढाच दिलासा असेल.