वस्तू आणि सेवाकरात फायदा झाल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) व्यावसायिकांना त्रास झाल्याबद्दल टीका होत असली तरी हाच ‘जीएसटी’ महाराष्ट्राच्या तिजोरीसाठी मात्र लाभदायी ठरला आहे. या वर्षीच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत मागील वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत राज्य सरकारच्या महसुलात ‘जीएसटी’मुळे ३९.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांत सरकारच्या तिजोरीत अपेक्षेपेक्षा अधिक महसूल जमा होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी पहिल्या तिमाहीत राज्य सरकारला २५ हजार ७४२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. त्यानंतर जुलै २०१७ मध्ये देशभरात ‘जीएसटी’ लागू झाला. या वर्षी एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ३५ हजार ९१५ कोटी रुपये महसूल मिळाला असून ‘जीएसटी’मुळेच हा लाभ झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

‘जीएसटी’ लागू झाला तेव्हा महाराष्ट्र हे उत्पादनक्षेत्रात अग्रेसर राज्य असल्याने त्याचा फारसा फायदा महसूल वाढीत होणार नाही, असे काही तज्ज्ञांचे मत होते. मात्र राज्याची ११ कोटी लोकसंख्या आणि त्यांची क्रयशक्ती याकडे साऱ्यांचे दुर्लक्ष झाले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

राज्याची लोकसंख्या मोठी असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लोकांची क्रयशक्ती मोठी आहे. दरडोई उत्पन्न एक लाख २० हजारांच्या आसपास आहे, तर अर्थव्यवस्थेचा आकार २७ लाख ९६ हजार कोटी रुपये आहे. आर्थिक परिस्थिती चांगली तसेच नागरीकरण जास्त असल्याने लोकांची उपभोगाची क्षमताही मोठी आहे. त्याचाच परिणाम ‘जीएसटी’च्या महसुलात वाढ होण्यात झाला असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

‘भाजप’ सरकार नोव्हेंबर २०१४ मध्ये सत्तेवर आले तेव्हा राज्य सरकारला ८ हजार ५०० कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा वारसा आधीच्या सरकारकडून मिळाला होता. आता ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने सरकारच्या तिजोरीतील महसुली जमा पूर्वीपेक्षा चांगली होईल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.