प्रशिक्षण केंद्रात शिक्षकांना अवैज्ञानिक धडे * अमरकंटकचा नागराजबाबा अवतारी पुरुष असल्याचा प्रचार

शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खासगी भक्ती मार्गाचा तडाखा राज्यातील शिक्षकांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बसू लागला आहे. बाबा, बुवांची शिबिरे, पुस्तकांचे वाटप, कीर्तन महोत्सवात घेण्यात येणाऱ्या कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी धार्मिक संस्थांच्या चाचण्या असे प्रकार सातत्याने राज्यातील शाळांमधून घडत असल्याची तक्रार शिक्षकांकडून केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या चौकटीतच अपेक्षित असलेल्या धार्मिक संकल्पना, श्रद्धा यांना शिक्षण कार्यशाळेत नाहकपणे राबवले जात असल्याबद्दल शिक्षण वर्तुळात नाराजी पसरली आहे.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या सूचनांनुसार राज्यातील शाळांमध्ये आणि शिक्षकांसाठी बाबा, बुवांची शिबिरे आयोजित केली जात असल्याची तक्रार होत आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरेशी संबंधच नसलेल्या या शिबिरांबाबत शिक्षकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. नुकतेच बुलढाणा जिल्ह्य़ातील मोताळा तालुक्यातील एका शिक्षण केंद्रासह विदर्भातील अनेक ठिकाणी चेतना विकास मूल्यशिक्षण कार्यशाळा काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांच्या आयोजनासाठी काही दात्यांची मदत घेतली गेली.

बाबा नागराज कोण?

बाबा नागराज यांनी छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्य़ात एका आश्रमाची स्थापना केली होती. या ठिकाणी बाबांच्या सिद्धांतावरील ‘जीवन दर्शन’ शिकवले जाते. अनेक राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी हे आश्रमाचे अनुयायी आहेत.  शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार बाबा नागराजचे भक्त असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती

काही वर्षांपूवी  नंदकुमार यांनी असाच प्रकार केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांची शिक्षण विभागातून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. सरकार बदलल्यानंतर त्यांना पुन्हा शिक्षण विभागात घेण्यात आले. आता पुन्हा या अधिकाऱ्याचा प्रताप शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.

तीन वर्षांपूर्वी या अधिकाऱ्याची शिक्षण विभागात नियुक्ती झाल्यावर काहीच दिवसांत तुरुंगात असणाऱ्या आसाराम बापूच्या पुस्तकांचे वाटप राज्यातील काही शाळांमध्ये करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या पुस्तकांवर विद्यार्थ्यांची चाचणीही घेण्यात येणार होती. शाळेत व्हॅलेंटाइन डेला आई-वडिलांचे पूजन करण्याचा प्रकारही वादग्रस्त ठरला होता. यंदाही काही शाळांमध्ये असे उपक्रम घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी शिक्षकांचे प्रशिक्षण चक्क कीर्तन महोत्सवात आयोजित करण्यात आले. आपली कामे, अध्यापन गुंडाळून शिक्षकांना या कीर्तन वर्गाला हजेरी लावावी लागली होती.

शिक्षण विभाग काय म्हणतो?

* शिक्षण विभागाकडून अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात येत नसल्याचे बुलढाणा जिल्ह्य़ाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीराम पानझाडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तसेच अशी शिबिरे होत असतील तर त्यात सहभागी व्हायचे की नाही, हे शिक्षकांनी ठरवायचे आहे. कुणावरही सक्ती केली जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

* विद्या प्राधिकरणाने मात्र शिबिर झाल्याची कबुलीच दिली आहे.

* शिक्षकांना मागणीनुसार प्रशिक्षण देण्याचा शासनाचा निर्णय आहे. चेतना विकास मूल्यशिक्षण कार्यशाळेची मागणी राज्यातील १४९ शिक्षकांनी केली होती. त्यानुसार जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था बुलढाणा यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. प्रशिक्षणात शिक्षकांना शिक्षक- पालक, शिक्षक-विद्यार्थी आंतरसंबंध दृढ होण्यासाठी मदत झाल्याचे मत प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी व्यक्त केले, असे स्पष्टीकरण विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे.

नेमका प्रकार काय?

* बुलढाण्यासह विदर्भातील अनेक भागांत ‘जीवन विद्या’, ‘चेतना विकास’ अशा विविध नावांनी शिक्षकांसाठी शिबिरांचे आयोजन केले होते.

* या शिबिरात मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील बाबा नागराज हे कसे अवतारी पुरुष होते, त्यांना साधनेतून कशा प्रकारे दिव्यदृष्टी प्राप्त झाली याची महती ऐकवण्यात आली.

* या बाबाची पुस्तकेही शिक्षकांना देण्यात आली. बाबा महती हे  प्रशिक्षणाचे विषय आहेत व प्रशिक्षणाचा काय फायदा शिक्षकांना झाला, यावर कोणीही वरिष्ठ बोलण्यास तयार नाही. मात्र शिक्षकच या प्रशिक्षणातून काय साध्य केले जात आहे, असा प्रश्न विचारू लागले आहेत.

ती कार्यशाळा शिक्षकांच्या मागणीनुसार आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे माझ्या सूचनेनुसार ती आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 – नंदकुमार, प्रधान  सचिव, शालेय शिक्षण    विभाग

 

बाबा नागराज आणि डार्विन

मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या सिद्धांताबाबत नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. गंमत म्हणजे डार्विनच्या सिद्धांताबाबत बाबा नागराजच्या पुस्तकातही काही मजेशीर उल्लेख आहेत. प्रश्नोत्तराच्या स्वरूपातील हा मजकूर जशाच्या तसा पुढीलप्रमाणे..

प्रश्न – तुमचा विकासाचा सिद्धांत आणि डार्विनचा विकासाचा सिद्धांत यात फरक काय?

उत्तर – (काही अंश) डार्विनने सगळ्यांसमोर जे काही ठेवले आहे, ते म्हणजे शरीर रचनेच्या आधारावर विकास सांगितला आहे. डार्विनने शरीररचनेबाबत जे काही म्हटले आहे त्याबाबत थोडा आक्षेप आहे, पण मानवाबाबत जे काही म्हटले आहे, त्याबद्दल खूपच आक्षेप आहे. डार्विनच्या म्हणण्यानुसार माकडाचे क्रमश: रूपांतर होत मानव शरीर बनले. या दरम्यान बरेचसे जीव शरीर बनले, जे नष्ट झाले. माझ्यानुसार कुठल्या ना कुठल्या समृद्ध मेधसंपन्न जिवाच्या गर्भाशयामध्ये प्राणसूत्रामध्ये अनुसंधान होण्याचा उद्देश हा होता की, अशा शरीररचना परंपरेला स्थापित करायचे आहे की ज्या माध्यमातून जीवन आपल्या जागृतीला प्रमाणित करू शकेल. मात्र डार्विनच्या म्हणण्यानुसार निसर्ग आणि वातावरणाच्या दबावामध्ये या अनिश्चित शरीररचना झाल्या. जीवन ज्ञान डार्विनला नव्हतं. जीवनाला ध्रुव मानून त्याने काहीही म्हटले नाही.

महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा मार्ग दाखवलेला असताना अशा प्रकारची अतार्किक प्रशिक्षणे आयोजित करण्यात येत असतील, तर आपण कुठे तरी भरकटत चाललो आहोत, हेच यातून दिसून येते. अशा पद्धतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही.

– महेश ठाकरे, राज्य अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना