वीजग्राहकांना कधीही वीजबिल भरता यावे यासाठी ‘महावितरण’ने राज्यातील महानगरांमध्ये बसवलेल्या ‘एनी टाइम पेमेंट मशीन’ला(एटीपी यंत्रणा) दणदणीत प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही सेवा ग्रामीण भागातही राबविण्यात येणार आह़े  प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशी ‘एटीपी’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १०० तालुक्यांत ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
दर महिन्याच्या वीजबिलाचे पैसे ग्राहकांना आपल्या सोयीच्या वेळी भरता यावेत यासाठी ‘महावितरण’ने बँकांच्या ‘एटीएम’ यंत्रणेच्या धर्तीवर, एटीपी यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली. आजमितीस पुणे, भांडुप, नागपूर, औरंगाबाद, नवी मुंबई अशा महानगरांमध्ये एकूण १०६ यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. वीजग्राहकांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला १५० कोटी रुपये या ‘एटीपी’ यंत्रणेतून वसूल होत आहेत. अशारितीने वर्षांला १८०० कोटी रुपयांची वसुली होत आहे.
ग्राहकांसाठी अत्यंत सोयीची असलेली ही यंत्रणा आता शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातही असावी आणि तेथील ग्राहकांनाही आधुनिक सुविधेचा लाभ मिळावा याहेतून राज्याच्या प्रत्येक तालुक्यात एटीपी यंत्रणा बसवण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात १०० तालुक्यांमध्ये एटीपी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही यंत्रणा ‘महावितरण’च्या कार्यालयांच्या आवारातच असायची. आता लोकांना सोय व्हावी यासाठी बाजारपेठेसारख्या भागातही जागा भाडेपट्टय़ाने घेऊन ही एटीपी यंत्रणा बसवण्याचा विचार सुरू आहे.
ही एटीपी यंत्रणा मुख्यालयाच्या सव्‍‌र्हरशी जोडलेली आहे. त्यामुळे वीजबिलाचा भरणा करताच त्याची नोंद यंत्रणेत होईल.
सध्या असलेल्या एटीपी यंत्रणेत धनादेश, रोख रकमेद्वारा वीजबिल भरण्याची व्यवस्था आहे. आता नवीन येणाऱ्या एटीपी यंत्रणेत कार्डद्वारे पैसे भरण्याची व्यवस्था असणार आहे.