राज्यातील सरकारी व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशाकरिता राबविण्यात येणाऱ्या ‘केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये’तून (कॅप) ऑनलाइनची एक प्रवेश फेरी कमी करण्यात आल्यामुळे यंदा तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांकरिता तंत्रशिक्षण संचालनालयाला शेवटची समुपदेशन फेरी राबवावी लागत आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल आठ पटीने जास्त आहे. साहजिकच त्याचा प्रचंड ताण सोमवारपासून सुरू झालेल्या समुपदेशन फेरीवर असणार आहे.
नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मान्यतेची प्रक्रिया लांबल्याने यंदा संचालनालयाला अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास उशीर झाला. त्यातून प्रवेशाकरिता सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेले वेळापत्रक पाळणे बंधनकारक होते. ते पाळण्याकरिता संचालनालयाला कॅपची ऑनलाइनची एक फेरी कमी करावी लागली. एरवी ऑनलाइनच्या तीन फेऱ्या राबविल्या जातात. त्यानंतर प्रवेशाविना राहिलेल्या विद्यार्थ्यांकरिता चौथी व शेवटची समुपदेशन फेरी राबविली जाते. गेल्या वर्षी सुमारे तीन हजार विद्यार्थी समुपदेशनाकरिता पात्र ठरले होते. पण, यावेळेस एक ऑनलाइन फेरी कमी करण्यात आल्याने संचालनालयाला तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांकरिता समुपदेशन फेरी राबवावी लागणार आहे.
समुपदेशन फेरी ही राज्यभरात सहा ते सात केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांला मुलाखतीसाठी बोलाविले जाते. राज्यभरातील रिक्त जागांची माहिती या विद्यार्थ्यांसमोर मांडली जाते. त्यातून त्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडता येते. प्रत्येक विद्यार्थ्यांला बोलावून ही फेरी राबविली जात असल्याने ती वेळखाऊ असते. त्यातून यंदा तब्बल २३ हजार विद्यार्थी समुपदेशनाकरिता पात्र ठरल्याने संचालनालयाला ही फेरी राबविताना मोठी कसरत करावी लागते आहे. १ ऑगस्टपर्यंत समुपदेश फेरी चालणार आहे. राज्यभरात सात केंद्रांवर ही फेरी चालेल. पण, विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे चार दिवसांत ही फेरी पूर्ण होईल का, अशी शंका आहे.
दुसऱ्या फेरीवर आक्षेप
कॅपच्या दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांनी दिलेल्या अभ्यासक्रमांच्या पहिल्या सात पर्यायांपैकी कोणत्याही ठिकाणी प्रवेश मिळाल्यास तो स्वीकारणे बंधनकारक होते. अन्यथा संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतो. मात्र, या अटीमुळे काही विद्यार्थ्यांमध्ये अन्याय होत असल्याची भावना आहे. सातपैकी एका पर्यायावर प्रवेश मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांला बेटरमेंटची संधी मिळत नाही. पण, आपल्यापेक्षा कमी गुण असलेले विद्यार्थी केवळ त्यांनी दिलेल्या सात पर्यायांपैकी कुठल्याही पर्यायावर प्रवेश मिळाला नाही म्हणून समुपदेशन फेरीमधून बेटरमेंटकरिता पात्र ठरत आहेत. हा त्यांच्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या परंतु, सात पर्यायांमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. परिणामी पर्यायांची संख्या कमी करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.