पावसामुळे लोकल, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक शासकीय कार्यालयांत कामकाजात व्यत्यय

मुंबई : आदल्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारी रुळांवर पाणी साचून मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तसेच सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. याचा सर्वाधिक फटका अत्यावश्यक सेवेसाठी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना बसला. वाहतुकीचे साधन नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना घरी परतावे लागले तर अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयांतील कामकाजावरही याचा परिणाम झाला.

सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबई व परिसराला चांगलेच झोडपले. त्याचा परिणाम मंगळवारी लोकलच्या वेळापत्रकावरही झाला. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम व मध्य रेल्वेवर लोकल सुरू आहेत. पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे सकाळी कार्यालय गाठण्यासाठी स्थानकात आलेल्यांना लोकलसाठी ताटकळत राहावे लागले. पश्चिम रेल्वेच्या दादर, प्रभादेवी स्थानकात पाणी साचल्याने सकाळी ८.३० पासून वांद्रे ते चर्चगेट चारही मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात आली. वांद्रे ते डहाणू रोड स्थानकापर्यंतची वाहतूक मात्र सुरूच होती. लोकल चर्चगेटपर्यंत जाणारच नसल्याने अनेकांनी पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला.

हीच परिस्थिती मध्य रेल्वेवरही होती. मध्य रेल्वेवरीलही सायन, परळ, वडाळा स्थानकातील रुळांवर पाणी साचले. परिणामी सकाळी मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ठाणे ते वाशी, पनवेल आणि कल्याण स्थानकातून पुढे डाऊनला शटल सेवा सोडण्यात आल्या. दुपारपासून रुळांवरील पाणी ओसरल्यानंतर साधारण तीनच्या सुमारास मध्य रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक पूर्ववत झाले. दुपारी २.५५ वाजता ठाणे स्थानकातून सीएसएमटीसाठी लोकल सोडण्यात आली. तर सायंकाळी ४.१० वाजता हार्बर मार्गही पूर्ववत करताना वाशीहून सीएसएमटीसाठी लोकल सुटली. पश्चिम रेल्वेची सेवाही सकाळी ११.४० पासून सुरू झाली. अंधेरीतून चर्चगेटसाठी लोकल सोडण्यात आली आणि त्यानंतर हळूहळू लोकलचे वेळापत्रक पुन्हा रुळावर आले.

रस्ते वाहतुकीवर परिणाम

मुंबईतील ३३ ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. खासगी वाहनांनी साचलेल्या पाण्यातून वाट काढण्यापेक्षा पर्यायी मार्ग पत्करला. बेस्टनेही आपल्या ८० पेक्षा जास्त बस मार्ग अन्य मार्गाने वळविले. त्यामुळे रुग्णालय, पालिका कर्मचारी व बेस्टने जाणाऱ्या अन्य प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. हिंदमाता, प्रतीक्षानगर, वांद्रे एस.व्ही.रोड, गोरेगाव शास्त्रीनगर, दहिसर सब वे, अंधेरी एस.व्ही.रोड, ओशिवरा पूल, खोदादाद सर्कल, विद्याविहार स्थानकाजवळ, मालाड सब वे, मुलुंड एलबीएस, भेंडी बाजार, कांदिवलीतील डहाणूकरवाडी, अ‍ॅंटॉप हिल, किं ग्ज सर्कल इत्यादी ठिकाणी पाणी साचले होते.