‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत विविध विषयांवरील एकांकिकांचे दमदार सादरीकरण झाल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी उपस्थितांवर गारूड केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसा तत्त्वज्ञानाचे पैलू, गांधींचे विचार ‘उमगलेले गांधी’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून अनुभवण्याची संधी मिळाली.

आविष्कार निर्मित ‘उमगलेले गांधी’ हा महात्मा गांधी यांच्यावरील लेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ लाभली आहे. कार्यक्रमाची संकल्पना दीपक राजाध्यक्ष यांची आहे. उन्मेश अमृते यांनी संशोधन संपादन केले असून, निर्मिती आणि सूत्रधार अरुण काकडे आहेत.

नरहर कुरुंदकर लिखित ‘श्री गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी’ हा लेख दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सादर केला. गांधींना राष्ट्रपिता म्हणण्यामागील संकल्पना, गांधींचा धार्मिक राजकारणासाठी वापर याची चिकित्सक मांडणी या लेखात करण्यात आली. ‘अहिंसेची शक्ती’ हा विनोबा भावे यांचा लेख धनश्री करमरकर यांनी सादर केला. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे मर्मज्ञ चिंतन या लेखातून विनोबांनी मांडले आहे. ‘काश्मीरमध्ये गांधी आणि काश्मिरींविषयी गांधीजी’ या रामचंद्र गुहा यांच्या अनुवाद केलेल्या लेखाचे अभिवाचन ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी केले. वेगवेगळ्या काळात लिहिल्या गेलेल्या या लेखांतून गांधींचे आजच्या काळातही असलेले महत्त्व अधोरेखित झाले. या विचारशील अभिवाचनाला उपस्थित प्रेक्षकांकडूनही भरभरून दाद मिळाली.