नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : करोनापासून बचावासाठी केल्या जाणाऱ्या उपायांपैकी एक महत्त्वाचा आणि घरगुती उपाय म्हणजे वाफ घेणे; परंतु या वाफेचा आता नाक आणि घशासोबत डोळ्यांवरही दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अति वाफ घेऊन डोळ्यातील आद्र्रता नष्ट होणे, कडांना सूज येणे, बुबुळाला इजा होणे अशा तक्रारी सध्या रुग्णांकडून येत आहेत.

सध्या कामानिमित्त नागरिक घराबाहेर पडत असल्याने सुरक्षिततेचे नाना उपाय अजमावले जात आहेत. बहुतांश लोक त्यासाठी दिवसातून दोन वेळा वाफ घेत आहेत, परंतु अति आणि चुकीच्या पद्धतीने वाफ घेतल्याने त्याचा थेट डोळ्यांवर परिणाम होताना दिसत आहेत. दादर येथील एका रुग्णाला डोळे दुखण्याचा व डोळ्यांतून सतत पाणी वाहण्याचा त्रास जाणवू लागला. प्रथमोपचारानेही फरक न पडल्याने त्यांनी नेत्रचिकित्सकाकडे धाव घेतली. त्या वेळी वाफेच्या अतिरेकामुळे हे घडल्याचे समोर आले. डोळ्यांत सतत उष्ण वाफा जाऊन डोळ्यांतील रक्तवाहिन्या कमजोर झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. ‘अशा पद्धतीच्या तक्रोरी घेऊन रुग्ण सध्या येत आहेत. जास्त वाफ घेऊन डोळ्यांतील पोषक तत्त्वे नाहीशी होत असल्याचे दिसते. शिवाय डोळे कोरडे पडल्याने सतत पाणी वाहण्याचा त्रास रुग्णांमध्ये दिसून येतो. बरेच लोक डोळे उघडे ठेवून वाफ घेतात. त्यामुळे असे होत असावे,’ असे नेत्रतज्ज्ञ डॉ. जयेश नासर यांनी सांगितले.

वाफ घेतेवेळी यंत्रातून अतिउष्ण वाफेचा झोत थेट डोळ्यांवर आल्याने डोळ्यांवर जखम होऊन सूज चढल्याचेही प्रकार घडत आहेत. बच्चू अली नेत्र रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. सारिका शिंदे सांगतात, ‘डोळा हा नाजूक अवयव असल्याने त्यावर वाफेचा परिणाम होणे साहजिक आहे. विशेष म्हणजे वाफ घेताना विविध तेलद्रव्यांचा, औषधांचा वापर करणे टाळले पाहिजे. याला कोणताही वैद्यकीय आधार नसल्याने लोकांनी काळजी घ्यायला हवी.’

कोणत्याही शास्त्रोक्त माहितीविना अशी अतिस्वरूपात वाफ घेणे अत्यंत गैर आहे. लोक समाजमाध्यमांवर आलेल्या गोष्टींची चिकित्सा करत नाहीत. सध्या शंभर रुग्णांत दहा रुग्ण असे आहेत, ज्यांना वाफ घेऊन डोळ्यांना इजा झाली आहे. यात डोळे कोरडे होणे, सतत पाणी वाहने, कॉर्नल इंज्युरी (बुबुळाला इजा), डोळे लाल होणे असे प्रकार आहेत. अशा रुग्णांच्या इजा झालेल्या डोळ्याला चार ते पाच दिवस बंद ठेवून त्यावर उपचार केले जात आहेत.
– डॉ. शशी कपूर, नेत्रतज्ज्ञ