भायखळय़ातील मदनपुरा शाळेसह अन्य एका शाळेची डागडुजी

भायखळा येथील ११४ वर्षांपूर्वी बांधलेली मदनपुरा पालिका शाळा, तर ४० वर्षांपूर्वीच्या मोहम्मद उमर रज्जाब पालिका शाळेच्या इमारतींची अनुक्रमे ३.४७ कोटी रुपये व  ५.६७ कोटी रुपये असे एकूण नऊ कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून त्यावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. या शाळा इमारतींचा पुनर्विकास करण्याऐवजी कोटय़वधी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात येत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

भायखळा पश्चिम परिसरात १९०५ मध्ये मदनपुरा पालिका शाळेची दुमजली इमारत बांधण्यात आली होती. ही दगडी इमारत पुरातन वास्तूसारखी भासते. या शाळेमध्ये २३ खोल्या आहेत. या इमारतीमधील उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ३८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही इमारत धोकादायक बनल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता दुरुस्तीनंतर शाळेत बास्केटबॉल मैदान, खुले प्रेक्षागृह, छोटे फुटबॉल मैदान, इकोप्लेक्स खेळाचे ठिकाण विकसित करण्यात येणार आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून कंत्राटही देण्यात आले आहे. मात्र, ११४ वर्षांपूर्वी बांधलेल्या शाळेच्या इमारतीची पुनर्बाधणी करण्याची गरज असताना ३.४७ कोटी रुपये खर्च करून तिची दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र याबद्दल एकाही नगरसेवकाने स्थायी समितीमध्ये प्रशासनाला जाब विचारला नाही हे विशेष.

याच परिसरात १९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या मोहम्मद उमर रज्जाब मनपा शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या एक मजली इमारतीमध्ये ५९ खोल्या आहेत. सुमारे ४१ वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत मोडकळीस आली असून शाळेच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी ६७ लाख ६१ हजार रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले आहे.

या दोन्ही शाळांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आले होते. मात्र या जुन्या शाळांचा पुनर्विकास करण्याऐवजी कोटय़वधी रुपये खर्च करून दुरुस्ती का करण्यात येत आहे, असा प्रश्न एकाही नगरसेवकाने उपस्थित केला नाही.

सुधार समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव पुकारत क्षणभराचा विलंब न लावता या प्रस्तावांना मंजुरी देऊन टाकली. मात्र या दुरुस्तीनंतर या इमारतींचे आयुर्मान किती वर्षांनी वाढेल हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला आहे.