‘फेसबुक’वर मुलीच्या नावाने ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविण्याच्या एका प्रकरणात अभिषेक रासम (१८) या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी राजू सोनमे याला अटक केली आहे.
राजूने अभिषेकला ‘प्रियंका शहा’ या नावाने फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली होती. अभिषेकने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये बोलणेही होऊ लागले. त्यानंतर काही दिवसांनी राजूने अभिषेकला, मी प्रियांकाचा भाऊ असून तू माझ्या बहिणीशी अश्लील भाषेत बोलतोस असे सांगून ८ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. पैसे जमविता न आल्याने अभिषेक काळजीत होता. महाविद्यालयात जातो असे सांगून १४ फेब्रुवारी रोजी तो घरातून निघाला. पश्चिम रेल्वेवर दादर ते माटुंगा या स्थानका दरम्यान लोकलसमोर उडी मारुन त्याने आत्महत्या केली.
दरम्यान पोलिसांनी तपासाअंती पनवेल येथून राजूला अटक केली. राजूने अभिषेकला फ्रेण्ड रिक्वेस्ट का पाठविली, त्यांचे इतर मित्र कोण आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत.