News Flash

राजकीय राडय़ांमुळे पोलिसांचे सामान्यांकडे दुर्लक्ष -गृहमंत्री

राज्यात राजकीय घडामोडी तसेच राडेबाजीमुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढू लागला आह़े त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण, त्यांच्या समस्या, अशा प्राथमिक कर्तव्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होऊ लागले

| January 9, 2014 02:41 am

राज्यात राजकीय घडामोडी तसेच राडेबाजीमुळे पोलिसांवरील कामाचा ताण वाढू लागला आह़े  त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण, त्यांच्या समस्या, अशा प्राथमिक कर्तव्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे, अशी कबुली राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बुधवारी ठाण्यात दिली. तसेच पोलिसांवर कामाचा ताण वाढू नये, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमासाठी बुधवारी गृहमंत्री आर.आर. पाटील ठाण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. काही पक्षांकडून राडेबाजीची अपेक्षा नव्हती. त्यामुळे अशा पक्षांनी तरी असे प्रकार करू नयेत, अशी टोलेबाजीही त्यांनी ठाणे महापालिकेत नुकत्याच झालेल्या राजकीय मारहाणीबाबत या वेळी केली. पोलीस दलात चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करा पण, चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्याला नजरअंदाज करू नका, त्यांच्यामुळे पोलीस दलास कलंक लागत आहे, अशा सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. इमारत कोसळून निष्पापांचा मृत्यू होतो आणि बिल्डरच्या डायरीत पैशांच्या देवाण-घेवाणसंबंधी अधिकाऱ्यांची नावे सापडतात. त्यामुळे सर्वच विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भ्रष्टाचारातून बाहेर येण्याचे अंगीकारले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. बार रेडमध्येही काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे सापडत आहेत. पोलीस दलात चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तक्रारी पोलीस महासंचालक आणि माझ्याकडे आल्या असून पुरावे मिळताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इमारतीचे उद्घाटन
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या तळ अधिक चार मजली, अशा नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यानंतर, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी तसेच मालमत्तेच्या गुन्ह्य़ात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. त्या वेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, गृहविभागाचे व्यवस्थापकीय संचालक अरूप पटनायक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात नाशिक येथील मण्णपुरम गोल्ड कंपनीतील दरोडय़ाची उकल करणाऱ्या पथकास एक लाख रुपयांचे बक्षिस गृहमंत्री पाटील यांनी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 2:41 am

Web Title: feuds between political workers keeping police busy r r patil
टॅग : R R Patil
Next Stories
1 स्वपक्षीयांकडूनच मारहाण
2 रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह
3 धावत्या रेल्वेत अग्नितांडव ;९ मृत्युमुखी
Just Now!
X