गुरुदास कामत विरुद्ध संजय निरुपम वादाचे बैठकीत पडसाद
मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यातील वादाचे पडसाद राहुल गांधी यांच्या दोन दिवसांच्या मुंबई भेटीच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी उमटले आणि पक्षाच्या दोन आमदारांनी एकमेकांना शिव्यांची तर त्यातून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी परस्परांच्या विरोधात घोषणांची लाखोली वाहिली. या लाथाळ्यांच्या ‘दर्शना’ने अनेक आजी-माजी खासदारही स्तंभित झाले.
राहुल गांधी हे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस मुंबई भेटीवर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्याकरिता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलाविली होती. मिलिंद देवरा, प्रिया दत्त यांच्यासह सारे आजी-माजी खासदार व आमदार यावेळी उपस्थित होते. या दौऱ्यात मुंबईतील सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये राहुल यांच्या बैठका वा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. फक्त ईशान्य मुंबई मतदारसंघ डावलण्यात आल्याबद्दल काही नेत्यांनी आक्षेप घेतला. निरुपम यांच्या उत्तर मुंबई मतदारसंघात कार्यकर्त्यांची बैठक कशाला, असा सवाल माजी मंत्री नसीम खान यांनी केला. यावरून आमदार खान आणि आमदार अस्लम शेख यांच्यात जुंपली. उभयता अंगावर धावून गेल्याने काही काळ बैठकीत वातावरण तंग झाले. उभयतांनी परस्परांवर शिव्यांची लाखोली वाहिल्याचे समजते. या वेळी निरुपम यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी काही नेत्यांनी मधस्थी केल्यावर वाद मिटला.
राहुल रस्त्यावर
मुंबईतील वाढीव वीज बिलात कपात करण्यात यावी तसेच उपकारप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळावा म्हणून वांद्रे येथून राहुल गांधी शनिवारी मोर्चा काढणार आहेत. माहिम मच्छिमार कॉलनीकडून हा मोर्चा धारावीमध्ये जाईल. तेथे ९० फूट रस्त्यावर जाहीर सभा होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 4:55 am