मुंबई : मुंबईतील नदीपात्रात भराव टाकल्याने आणि संरक्षक भिंती बांधण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली. आरेमधील मेट्रो कारशेडच्या जागेत घालण्यात आलेला भराव, नद्यांच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती यामुळे आरेमध्ये काही ठिकाणी पाणी साचले होते. तसेच विलेपार्ले येथील काही चाळींमधील घरांमध्ये पाणी शिरले.

आरे येथील युनिट २२ जवळ संप्रू्ण रस्ता जलमय झाला होता. के लटी पाडा येथील घरे डोंगरावर असल्याने घरांमध्ये पाणी शिरले नाही, मात्र डोंगर उतारावर असणारा ओहोळ भरून वाहू लागल्याने रहिवाशांच्या येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला होता. ‘ओशिवरा आणि मिठी नदीच्या आरेतून जाणाऱ्या प्रवाहाच्या दोन्ही बाजूंना भिंती बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे जमिनीवरील पाणी नदीत आणि नदीतील पाणी जमिनीवर येऊ शकत नाही. परिणामी, गेली दोन वर्षे आरे परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचत आहे,’ अशी माहिती वनशक्ती संस्थेचे दयानंद स्टॅलिन यांनी दिली.

‘पूर्वी नदीची पाणी पातळी वाढली की अतिरिक्त पाणी भोवतालच्या पात्रात पसरत असे. मेट्रो कारशेडसाठी नदीपात्रात भराव टाकण्यात आला. नदीच्या सर्वोच्च पाणी पातळीपेक्षाही १५ ते २० फू ट उंचापर्यंत भराव टाकण्यात आला. त्यामुळे नदीच्या पुराचे पाणी पसरण्यासाठी जागाच उरली नाही आणि हे पाणी आरेमधील इतर सखल भागांत पसरू लागले,’ अशी माहिती पर्यावरण कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी दिली.

गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत होते. विलेपार्ले येथे पश्चिम द्रुतगती मार्गाच्या शेजारी असणाऱ्या शाकीनगरमध्ये अनेक चाळी आहेत. तसेच शेजारी एक नाला आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन विमानतळ प्रशासनाने नाल्याच्या दोन्ही बाजूंना भिंती बांधल्या. त्यामुळे शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी नाल्यात जाऊ शकले नाही. परिणामी हे पाणी शाकीनगरमधील वस्त्यांमध्ये शिरले, अशी माहिती एका स्थानिक रहिवाशाने दिली.

नागरिकांचे स्थलांतर

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चर्चा समाजमाध्यमांवर शुक्रवारी सुरू होती, मात्र अशा प्रकारे नदीने पातळी ओलांडली नसल्याचे पालिके कडून सांगण्यात आले. नदीची सर्वसाधारण सर्वोच्च जलपातळी ४ मीटपर्यंत आहे. सकाळी मुसळधार पाऊस सुरू असताना पाण्याची पातळी ३.७ मीटर म्हणजेच सर्वोच्च पातळीच्या जवळपास पोहोचली होती. त्यामुळे मिठीच्या परिसरातील काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरल्याने नागरिक पुन्हा वस्त्यांमध्ये परतले.