मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त शिक्षण संस्थेच्या (आयडॉल) परीक्षा घेण्यासाठी नेमण्यात आलेली कंपनी बदलण्याचा विचार विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.

आयडॉलच्या परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळानंतर विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. आयडॉलसह विद्यापीठ विभागांच्या परीक्षा घेण्याचे कंत्राट विद्यापीठाने चेन्नईमधील कंपनीला दिले आहे. परीक्षा घेणारी कंपनी अनुभवी नसल्याचे आरोपही अधिकार मंडळे, संघटनांनी केले होते. त्याचप्रमाणे या कंपनीला तिचे परतावा देण्यात येऊ नये अशीही मागणी करण्यात आली होती.

सध्या विद्यापीठाच्या विभागांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, आयडॉलच्या परीक्षांसाठी आता ही कंपनी बदलण्याचा विचार विद्यापीठाकडून सुरू आहे. याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. परीक्षेतील गोंधळावर तोडगा काढणे, कंपन्यांकडून प्रस्ताव मागवणे, नवी कंपनी निवडणे यासाठी समिती नेमण्याबाबत परिषदेच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पर्यायांचा शोध..

परीक्षा महाविद्यालयांवर सोपवता येतील का, कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या विषयांच्या परीक्षा गूगल अर्जाच्या माध्यमातून परीक्षा घेता येतील का अशा विविध पर्यायांची चाचपणीही विद्यापीठ करत आहे.

हाती उरले पाच दिवस..

आयडॉलच्या परीक्षा १८ तारखेपर्यंत विद्यापीठाने स्थगित केल्या आहेत. राहिलेल्या परीक्षा १९ पासून सुरू करण्यात येतील, त्याचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना नवे वेळापत्रक आतापर्यंत मिळणे अपेक्षित होते. आता नव्या कंपनीकडून प्रस्ताव मागवणे, कंपनीची निवड करणे अशी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वेळापत्रक जाहीर करणे हे सर्व विद्यापीठाला अवघ्या पाच दिवसांत पूर्ण करावे लागणार आहे.