मिरा भाईंदर शहरातील माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या एका महिला नगरसेविकेनं मेहता यांच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.

मागील आठवड्यात नरेंद्र मेहता यांनी अचानकपणे पक्षातील आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एका नगरसेविकेनं मेहता यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याबाबत संबंधीत महिलेनं पोलीस महानिरीक्षकाकडे तक्रारही केली होती. मंगळवारी अधिवेशनादरम्यान सभागृहातही याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर पोलिसांनी या नगरसेविकेचा जबाब नोंदवून घेतला.

सन २०१४ नंतर आपण नरेंद्र मेहतांविरोधात पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली जवळीक असल्याचे सांगून माझ्यावर दबाव टाकण्यात आला असल्याचा आरोप या महिलेनं तक्रारीत केला आहे. मेहता यांच्या सहकाऱ्यांविरोधातही संबंधीत महिलेनं आपल्याला धमकावल्याची तक्रार दिली आहे.