अभिनेत्री कंगना रणौत सध्या राज्यात चर्चेचा मुद्दा ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध शिवसेना अशी वाद उफाळून आला आहे. कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानांवरून शिवसेनेनं टीका केली होती. त्यानंतर हा वाद चिघळत गेला. यात महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग पाडल्यानंतर तिने संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘अरे तुरे’ची भाषा वापरली होती. याप्रकरणी आता कंगनावर मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईचा मुद्दा जोर धरताना दिसत आहे. कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेच्या पथकानं बुधवारी हातोडा चालवला. त्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या कंगनानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनानं त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. कंगनानं केलेल्या या टीकेवर नाराजी व्यक्त होत असताना मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नितीन वसंत माने असं तक्रार देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

 

कंगनानं मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप विक्रोळी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीसोबत मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका करतानाचा कंगनाच्या व्हिडीओचे ट्विटही जोडण्यात आलेले आहेत.

एका ट्विटमुळे पडली ठिणगी अन् वाद पेटला

राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनानं हे ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफिया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली. राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.