Fire breaks out in north Mumbai कमला मिल परिसरातील अग्नितांडवाची घटना ताजी असतानाच बुधवारी पहाटे मुंबईत पुन्हा एकदा भीषण आग लागल्याचा प्रकार घडला. अंधेरीच्या मरोळ परिसरातील मैमून या रहिवासी इमारतीला पहाटे दोनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मोईन कपासी (८०), तस्लीम कपासी (४२),सकीना कपासी (१३) , मोईज कपासी (८) अशी मृतांची नावे आहेत. तर इमारतीमधील अन्य सात रहिवासी या आगीत जखमी झाले आहेत.

मैमून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली. यावेळी रूम क्रमांक ३०६ मधील कपासी कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यामध्ये १३ वर्षांच्या लहान मुलीचाही समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग लागल्यानंतर कपासी कुटुंबीयांपैकी एकजण घरातून बाहेर पळाला. यावेळी घराचा दरवाजा लॉक झाला. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य घरातच अडकून पडले. आगीची तीव्रता वाढू लागल्यानंतर हे सर्वजण घराच्या खिडकीपाशी आले. येथून ते तब्बल अर्धा तास मदतीसाठी आक्रोश करत होते. मात्र, खिडकीला असलेल्या लोखंडी जाळीमुळे नागरिकांना त्यांना मदत करता आली नाही आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. स्थानिकांच्या दाव्यानुसार, अग्निशामन दल उशिरा आल्यामुळे या चौघांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, अग्निशमन दलाच्या दाव्यानुसार इमारतीकडे जाण्यासाठीची वाट खूपच अरूंद असल्याने त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक ते दीड तासांत अग्निशामन दलाने आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत इमारतीचा तिसरा व चौथा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. या घटनेनंतर जखमींना नजीकच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.