मुंबई अग्निशमन दलात लवकरच समावेश

गेल्या काही दिवसांपासून गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागण्याच्या वाढत्या घटना आणि या आगी विझवण्यासाठी अपुरे पडणारे मानवी प्रयत्न याचा विचार करून मुंबई महापालिकेने अग्निशमन दलात ‘फायर रोबो’ दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ९१.७२ लाख रुपये खर्च करून एक ‘फायर रोबो’ खरेदी करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमधील टोलेजंग इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणावर आगीच्या घटना घडल्या असून आग लागल्यानंतर घटनास्थळी धुराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे अग्निशमनाचे कार्य करणाऱ्या अग्निशामकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापूर्वी काही ठिकाणी लागलेल्या आगींच्या घटनांमध्ये धुरामुळे गुदमरलेल्या अग्निशामकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आगीच्या वाढत्या घटनांमधील धोके ओळखून रोबोच्या माध्यमातून अग्निशमनाचे कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अग्निशमन दलासाठी एक फायर रोबो खरेदी करण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला आहे.

फायर रोबोचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेमध्ये तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी लघुतम निविदा असलेल्या मे. श्री ललिता कंपनीस हे कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुमारे ९१ लाख ७२ हजार ८०० रुपये खर्च करून हा फायर रोबो खरेदी करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. स्थायी समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर फायर रोबो खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल. अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर रोबो दाखल झाल्यानंतर अग्निशमनाच्या कार्यातील अडथळ्यांवर मात करणे अग्निशामकांना शक्य होईल.

मानवी मर्यादा

* मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अग्निशमन दलाला अग्निशमनाचे काम करावे लागले होते. त्या वेळी अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.

* मुंबईतील पेट्रोकेमिकल कारखाने, अणुऊर्जा संशोधन केंद्र या ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्यास अग्निशमनाचे कार्य करणे धोकादायक ठरू शकते.

* मुंबईलगत असलेल्या बुचर बेटावर लागलेल्या आगीच्या वेळी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये अग्निशमनाचे कार्य करावे लागले होते.