जानेवारीत चाचणी; सामान्य लोकलचे बारापैकी सहा डबे वातानुकूलित

मुंबई : बारा डब्यांच्या सामान्य लोकलचे सहा डबे वातानुकूलित करून त्याची चाचणी घेण्यावर अखेर पश्चिम रेल्वेने शिक्कामोर्तब केले आहे. अर्ध वातानुकूलित लोकलच्या चाचणीचे अन्य दोन प्रस्ताव सध्यातरी विचारात घेणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. सहा डब्ब्यांच्या अर्ध वातानुकूलित लोकलची चाचणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरीली वातानुकूलित लोकल गाडीला सध्या तरी थंड प्रतिसाद आहे. सामान्य लोकलच्या बारा फेऱ्या रद्द करुन वातानुकूलित लोकल चालवण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे ती वेगळी. त्यामुळे बारा डबा वातानुकूलित लोकल चालवण्याऐवजी अर्ध वातानुकूलित लोकल चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेने बारा डब्यांच्या सामान्य लोकलचे सहा डबे वातानुकूलित डब्ब्यांना जोडून त्याची चाचणी घेण्याचे ठरविले आहे.

या बरोबरच तीन डबे वातानुकूलित आणि नऊ डबे विना वातानुकूलित व पंधरा डबा लोकलमधील नऊ डबे विना वातानुकूलित आणि सहा डबे वातानुकूलित असे दोन प्रस्ताव विचारात होते. हे तिन्ही प्रस्ताव रेल्वेच्या रिसर्च डिजाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेनकडे (आरडीएसओ) मंजुरीसाठी पाठवले होते. यामध्ये वातानुकूलित लोकलसाठी यंत्रणा बनवणाऱ्या भेल कंपनीचीही मंजुरी आवश्यक होती. यातील प्रथम बारा डब्यांपैकी सहा डबे वातानुकूलित असलेल्या अर्ध वातानुकूलित लोकल चाचणीला मंजुरी मिळाली आहे. उर्वरित पर्याय तांत्रिक कारणांमुळे स्वीकारता येणार नाहीत.

जानेवारीत चाचणी

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी बारापैकी सहा डब्यांच्या अर्ध वातानुकूलित लोकलच्या चाचणीवरच शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले. त्यामुळे अन्य दोन प्रस्तावांचा विचार सध्यातरी केला जाणार नाही. या लोकलची चाचणी जानेवारी महिन्यात होणार आहे. या चाचणीनंतरच अर्ध वातानुकूलित लोकल चालवणे शक्य आहे का हे स्पष्ट होईल.