शीव येथे शौचालयाच्या टाकीचा स्फोट होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. म्हाडाने आमदार निधीतून हे शौचालय बांधले होते. या शौचालयाची देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे सेफ्टिक टँकमध्ये विषारी वायू साठून त्याचा स्फोट झाला. या दुर्घटनेतील पाच जखमींना पालिकेच्या शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शीव एलबीएस रोड शिव मंदिर येथे सकाळी ८.३० वाजता सार्वजनिक शौचालयाच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. यामध्ये स्फोटानंतर शौचालयाचा काही भागही कोसळला. या दुर्घटनेत चंद्रशेखर जैयस्वाल (२८), मोहम्मद शेख (२९), हमीद खान, कमलेश जैयस्वाल, पलचंद्रा चौबे हे पाच जण जखमी झाले. जखमींना तातडीने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून इतर चार जणांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. झोपडपट्टय़ांमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांची सुविधा नसल्यामुळे शौचालयांच्या बाहेर सेफ्टिक टँक बसवले जातात.

“दुर्घटनाग्रस्त झालेले हे शौचालय म्हाडाने बांधलेले होते. काही वर्षांपूर्वी म्हाडाने बांधलेली शौचालये पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र हे शौचालय हस्तांतरित केलेले नव्हते. हे शौचालय ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती करणे शक्य असल्यास तसे केले जाईल.” – किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर