बनावट नाव आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज काढून बँकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखा-११ च्या पोलीस पथकाने अटक केली आहे. ही टोळी बनावट नाव धारण करून त्या बनावट नावाने आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना काढून बँकांची फसवणूक करत होती. विविध बँकांमधील ओळखीचा फायदा उठवत त्यांनी वाहन आणि गृह कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न करता ते बँकांची फसवणूक करत होते.

या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखा-११ च्या पोलीस पथकाने अटक केली. आतापर्यंत या पाच आरोपींनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखा युनिट-११ चे प्रभारी पोलीस  निरीक्षक  चिमाजी आढाव याना खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने उपायुक्त गुन्हे अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बनावट नाव धारण केलेल्या रोमी कपूर पर्यंत पोहचले असता त्याच्याकडे रोमी राजेन कपूर व कौशिक नाथ या दोन नावाचे पॅनकार्ड,आधारकार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर महत्वाची कागदपत्र आढळली.

मात्र एकच फोटो दोन नावांवर होता. रोमी कपूरच्या चौकशीत बनावट नाव धारण करणाऱ्या इसमाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने तयारी केल्याचे  सांगितले. ही बनावट कागदपत्रे वाहन किंवा गृहकर्ज मिळवण्यासाठी उपयोगात आणत होते. यामधील एका आरोपीने बनावट नावाने आयटी फाईल तयार करून मुख्य आरोपीस मदत केली. तर मुख्य आरोपीने माजिवडा ठाणे येथील एका नामंकित बिल्डरकडून बनावट नावाने गाळा घेतल्याचे भासविले.

त्यानंतर बँक एजंट असलेल्या आरोपीची मदत घेऊन इंडियन बँक मांडवी शाखेतून २९ लाख व २१ लाख अशी दोन वाहन कर्ज काढली. सदर सर्व रक्कम आरोपी हे वाटून घ्यायचे. या टोळीने करोडो रुपयांचा चुना विविध बँकांना लावला असल्याचे स्पष्ट झाले, एवढेच नाही तर रोमी कपूर उर्फ कौशिक याने कोक्कत्त येथेही कोट्यवधींचा चुना लावल्याचे समोर आले आहे. या पाच जणांची टोळी सध्या पोलिसांच्या कस्टडीत आहे, मात्र त्यांनी केलेल्या फसवणुकीचा शोध घेत त्यांच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी सांगितले.