सैफी रुग्णालयातील करोनाचा संसर्ग झालेल्या  हृदविकारतज्ज्ञांच्या १४ जण थेट संपर्कात आलेले असून यातील पाच जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तर त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या पाच रुग्णांना देखरेखीखाली ठेवले आहे.

मूत्रविकारतज्ज्ञ वरिष्ठ डॉक्टरांचा (८५) २६ मार्चला हिंदुजा रुग्णालयात करोना संसर्गामुळे निधन झाले. इंग्लंडहून आलेल्या त्यांच्या नातवासह मुलगा, सून यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांचा मुलगा हृदयविकारतज्ज्ञ असून २० मार्चपासून सैफी रुग्णालयात ते शस्त्रक्रिया करत होते. त्यांनी पाच रुग्णांवर शस्त्रक्रिया केली असून यांनाही  संसर्ग होण्याची लक्षात घेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे.

सैफीमध्ये त्यांच्या संपर्कामध्ये ४० जण आल्याची माहिती मिळाली असून यात १४ जण थेट संपर्कात आलेले आहेत. यातील पाच जणांना रुग्णवाहिकेतून विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. नऊ जणांना रुग्णालयाच्या ठाकूरद्वार येथे असलेल्या वसतिगृहात अलग ठेवले आहे. डॉक्टरांचा बारुग्ण विभाग असलेला मजला बंद केला आहे. कमी जोखीम असलेल्या परंतु संपर्कामध्ये आलेल्या २६ जणांना घरातच अलग राहण्याच्या सूचना पालिकेने दिलेल्या आहेत. सैफी रुग्णालयातील  ५६ रुग्णांना घरी सोडले आहे.

२७ मार्चपासून १४ दिवस सैफी रुग्णालयातील बारुग्ण, अतिदक्षता आणि शस्त्रक्रिया खोली पूर्णत: बंद केली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांच्या चाचण्या झाल्या असून  त्यांचे अहवाल आलेले नाही, असे पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त  प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

४० वर्षीय महिलेचा संसर्गामुळे ‘केईएम’मध्ये मृत्यू

केईएम रुग्णालयातील आपत्कालीन विभागामध्ये शनिवारी दुपारी ४० वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. महिलेला दाखल केल्यावर कृत्रिम श्वसनयंत्रणा लावण्यात आली. त्या वेळी औषधशास्त्र (मेडिसिन) विभागातील दोन युनिट कार्यरत होते. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह मेडिसिन विभागातील सर्व निवासी डॉक्टर संपर्कात आल्याने त्यांना वसतिगृहातच अलग राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते. तसेच विभागात त्या वेळी कार्यरत असलेल्या परिचारिकांसह इतर निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही अलग राहण्यास सांगितले आहे.