टाळेबंदीच्या काळात आकाशवाणी आणि  दूरदर्शनच्या कार्यक्रमांचे दिल्लीतून केंद्रीकरण करण्यात आले असून त्याचा परिणाम प्रादेशिक भाषेतील कार्यक्रमांवर झाला आहे. नियमित आणि प्रायोजित असलेले अनेक कार्यक्रम स्थगित करून दिल्ली केंद्रावरील कार्यक्रम सहक्षेपित करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे भविष्यात स्थानिक कार्यक्रम बंद होतील की काय, अशी भीती येथील अधिकारी वर्गाला वाटत आहे.

गेल्या काही दिवसांत आकाशवाणीवरील वार्तापत्रांची संख्या कमी झाली असून, विविधभारती आणि अस्मिता वाहिनीवरील कार्यक्रम सहक्षेपित करावे लागत आहेत. तर पंतप्रधान आणि  केंद्र सरकारच्या करोनावरील योजना यशस्वी ठरत असल्याचे दाखवण्यासाठी आकाशवाणीच्या मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार केंद्रांना प्रत्येकी तीन लाभार्थीची माहिती देण्याची सक्ती करण्यात येत आहे.

आरोग्य मंत्रालयाचे बरेचसे काम पुण्यातून होत असल्याने पुणे केद्रावरून ‘करोना महाराष्ट्र’ हा विशेष कार्यक्रम राज्यभर प्रसारित केला जात आहे. राज्यस्तरीय बातम्या येथूनच दिल्या जात आहेत, अशी माहिती आकाशवाणी मुंबई केंद्रातील कार्यक्रम अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक कार्यक्रम आणि बातम्या प्राधान्याने दिल्या जाव्यात, अशाच सूचना असल्याने आकाशवाणीची राज्यातील केंद्रे त्यानुसार कार्यक्रमांचे प्रसारण करत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सातत्याने लोकांवर कोविड -१९ बद्दलच्याच माहितीचा भडिमार होऊ नये याची काळजी घेत मधून मधून मनोरंजक कार्यक्रमांचीही पेरणी केली जात आहे. सध्या अस्मिता वाहिनी पाच तास सुरू असते. एफएम गोल्ड वाहिनीवर पूर्णवेळ बातम्या दिल्या जातात. अस्मिता, एफएम रेनबोवर सकाळी ८ ते ११ स्थानिक कार्यक्रम, रोजची वार्तापत्रे असतात. ११ ते २ मनोरंजनाचे कार्यक्रम हे विविधभारतीकडून प्रसारित केले जातात.

होतेय काय?

स्थानिक कार्यक्रमांच्या निर्मितीवर परिणाम झाला असल्याने  विविध भारती मुंबई आणि अस्मिता वाहिनीवरील कार्यक्रम सहक्षेपित करावे लागत आहेत. करोना संसर्गाची परिस्थिती निर्माण झाल्यावर कर्मचारी आणि श्रोत्यांचे हित लक्षात घेऊन कामाचे नियोजन करायला हवे होते, अशी माहिती आकाशवाणीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

वार्तापत्रे बंद..    मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारी तीन राष्ट्रीय वार्तापत्रे बंद झाली आहेत. एफएम वाहिनीवरून दोन मिनिटांच्या दिल्या जाणाऱ्या ठळक बातम्यांमध्ये मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या सर्व बातम्या बंद आहेत, तर पुण्यात पाच वेळा दिल्या जाणाऱ्या बातम्यांपैकी आठ वाजता आणि सहा वाजता अशा दोनच वेळा बातम्या द्याव्या लागत आहेत.